ठाणे : बेलापूर ते ठाणे मार्गावर कळवा ब्रीजजवळ असलेल्या हाईट गेटला कंटेनरने धडक दिल्याची घटना शुक्रवारी पहाटे तीन ते सव्वा तीनच्या सुमारास घडली. या धडकेत हाईट गेट कंटेनरवर पडल्याने तब्बल तीन तास बेलापूर-ठाणे रोडवरील वाहतूक बंद पडली होती. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. अपघातानंतर कंटेनरचा चालक घटनास्थळावरून पळून गेला, तर कंटेनर आणि पडलेला हाईट गेट रस्त्याच्या एका बाजूला केल्यानंतर रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत करण्यास तीन तासांचा अवधी लागल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
गीता रोडलाईन्स कंपनीचा कंटेनर नवी मुंबई न्हावा शेवा येथून गुजरात येथे निघाला होता. शुक्रवारी पहाटे ३ ते ३.१५ च्या सुमारास हा कंटेनर कळवा विटावा जुना बेलापूर ठाणे वाहिनीवरून जाताना अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच शहर वाहतूक शाखेचे पोलिस, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान यांनी घटनास्थळी धाव घेतली. पडलेला हाईट गेट क्रेन मशीनच्या साहाय्याने आणि कंटेनर टोइंग वाहनाच्या साहाय्याने एका बाजूला करण्यात आला. तसेच बेलापूर-ठाणे वाहिनीवरील वाहतूक पूर्ववत होण्यास सुरुवात झाली, तर दुसऱ्या वाहिनीवरून वाहतूक धीम्या गतीने सुरू ठेवल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाऱ्यांनी दिली.