कल्याण : विद्युत खांबांना भरधाव कंटेनरची जोरदार धडक बसल्याची घटना गुरुवारी पहाटे सूचकनाका परिसरात घडली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, विजेच्या खांबांचे नुकसान झाल्याने या परिसरातील बहुतांश भागात वीजपुरवठा गुरुवारी रात्रीपर्यंत पूर्ववत झालेला नव्हता.
कल्याण-शीळ मार्गावरून गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास शीळमार्गे जाणाऱ्या कंटेनरची सूचकनाका येथील ट्रान्सफार्मरला लागून असलेल्या विद्युत खांबांना धडक बसली. ही धडक इतकी जोरदार होती की, हे तीन खांब अक्षरश: वाकून रस्त्यावर कोसळले. यात विद्युतवाहिन्या तुटल्याने येथील महात्मा फुलेनगर, रामनगर, गणेशनगर, एकतानगर, आनंदनगर, अजंठानगर, आदी ठिकाणी अंधाराचे साम्राज्य होते. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दुपारपर्यंत तीनपैकी दोन खांब उभारून काही ठिकाणचा वीजपुरवठा सुरळीत केला. परंतु, काही ठिकाणी मात्र रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता, अशी माहिती रहिवासी मनोज वाघमारे यांनी दिली.
-----------------