ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरीदेखील आता डेंग्यू आणि मलेरियाने डोके वर काढले आहे. खरबदारी म्हणून महापालिकेने राबविलेल्या विशेष मोहिमेत शहरांतील ४३ हजार ३४३ घरांची तपासणी केली असता चार हजार ६८३ घरांमध्ये दूषित पाणी आढळले, तर ६२ हजार १०३ कंटेनरच्या तपासणीत चार ९११ कंटेनर दूषित आढळले आहेत. शहर साथींच्या आजारानी त्रस्त असताना महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. वैयजंती देवगीकर दीर्घ सुटीवर गेल्याने आरोग्य विभागच वाऱ्यावर आहे.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये जुलै महिन्यात ५१ संशयित रुग्ण आढळले आहेत, तर याच कालावधीत मलेरियाचे ५४ रुग्ण आढळले होते. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत मलेरियाचे ३६, डेंग्यूसदृश १३, चिकणगुनिया दोन आणि लेप्टोचे दोन रुग्ण आढळले आहेत.
या पार्श्वभूमीवर आता पालिका खडबडून जागी झाली असून शहराच्या विविध भागांत तपासणी मोहीम हाती घेतली आहे. त्या अनुषंगाने दरम्यानच्या कालावधीत कार्यक्षेत्रात ९० हॅण्डपंप, १० ट्रॅक्टर्स, ६ - ई रिक्षा, ८ - बोलेरो वाहनांमार्फत दोन सत्रात एक हजार ७०९ ठिकाणी औषध फवारणी आणि ४० धूर फवारणी, तर हॅण्डमशीनद्वारे १५ हजार २९९ ठिकाणी धूर फवारणी केली आहे, तसेच चार हजार ९११ दूषित कंटेनरमध्ये अळीनाशक टाकून ९७१ कंटेनर रिकामी केली असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.