ठाणे : प्रकल्पग्रस्तांसाठी असलेल्या वर्तकनगर येथील दोस्ती रेंटल इमारतीत दूषित पाण्यामुळे रोगराईचा फैलाव होत आहे. हा दूषित पाण्याचा प्रश्न लवकर सोडवला नाही तर मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा मनसेने दिला आहे.
डेंग्यू, मलेरिया यांसारख्या रोगांनी दोस्ती रेंटल येथील नागरिक मोठ्या प्रमाणावर त्रस्त आहेत. रेंटलमध्ये प्रकल्पग्रस्त नागरिकांना राहण्याची उत्तम सुविधा दिली जाईल, असे आश्वासन देऊन लोकांना येथे स्थलांतरित करण्यात आले. पण, येथे परिस्थिती खूप गंभीर असून, लोक मरणयातना भोगत आहेत, असा आरोप मनसे शाखाध्यक्ष राजेंद्र कांबळे यांनी केला आहे.
सन २०१२मध्ये झालेल्या या इमारतींमध्ये जवळपास अडीच हजार लोकांचे वास्तव्य आहे. येथे सोयी-सुविधांचा मोठ्या प्रमाणावर अभाव दिसत आहे. सध्या मोठ्या प्रमाणात भेडसावत असलेला दूषित पाण्याचा प्रश्न प्रशासनाने तातडीने सोडवावा, अशी मागणी कांबळे यांनी केली आहे.