भिवंडी: शहरातील मिल्लत नगर परिसरातील नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विशेष म्हणजे महापालिका प्रशासनाचे या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याने येथील नागरिकांनी महापालिका प्रशासना विरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.
भिवंडी शहरात मागील अनेक दिवसांपासून मिल्लत नगर परिसराबरोबरच निजामपुरा, शांतीनगर,गैबी नगर व इतर अनेक भागांमध्ये दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी अनेक वेळा केलेल्या आहेत. मात्र मनपा प्रशासनाच्या पाणी पुरवठा विभागाचे नागरिकांच्या समस्याकडे दुर्लक्ष होत असतानाच आता मिल्लत नगर परिसरातील नागरिकांच्या नळातून चक्क जंतू पाण्यावाटे येत आहेत. या जंतू मिश्रित पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून येथील नागरिकांना गॅस्ट्रो व इतर आजार होण्याची भीती येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे.