मुरबाड : तालुक्यात २० गावे व ३३ वाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई सुरू झाली असून पाडाळे धरणाजवळ असलेल्या खोपिवलीतील नागरिक ७० ते १०० रु पये मोजून शेजारील दोन किलोमीटर अंतरावरील मिल्हे गावातून बॅरलने पाणी आणून तहान भागवतात. माजगाव, कातकरीवाडी, पाटगाव पठार, माळशेजघाट पायथ्याशी जवळचे वाडे, पाड्यातील ग्रामस्थ दोनदोन किलोमीटर अंतरावरून खड्ड्यांतून दूषित पाणी आणतात.नदीनाले आटले असून विहिरींनी तळ गाठला आहे. रोजगार उपलब्ध नसल्याने शेकडो आदिवासी कातकऱ्यांचे वीटभट्ट्यांवर स्थलांतर झाले आहे. काही कुटुंबे तग धरून आहेत. त्यांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी तहसीलदार सचिन चौधर यांच्याकडे केली आहे. दरम्यान, कामतपाडा, कातकरीवाडीला टँकरने पाणीपुरवठा करण्याचे आदेश पवार यांनी दिले.शहापूर तालुक्यात टँकरने पाणीपुरवठाभातसानगर : शहापूर तालुक्यात सध्या १८ गावे, ६४ पाड्यांना १९ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. अजूनही १० गावे आणि २२ पाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली जात आहे. यंदाच्या टंचाई आराखड्यात ९० लाख खर्च करण्याची मंजुरी देण्यात आली आहे. सध्या तालुक्यात ज्या ज्या गावपाड्यात पाणीटंचाई आहे त्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. ज्यांचे प्रस्ताव आले आहेत त्यांनाही पाणी पुरवठा सुरु होईल. अशी माहिती गट विकास अधिकारी सुशांत पाटील यांनी दिली.
आदिवासींच्या नशिबी दूषित पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 5:14 AM