ठाणे : येथून जवळच असलेल्या मुंब्राच्या शंकर मंदिर,डॉ. आंबेडकर नगर, शिवाजी नगर, अमृत नगर या परिसरात ठाणे महापालिकेकडून दिवसांतून अवघे दोनच तास पाणी साेडले जात आहे. मात्र कालपासून दूषित पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त हाेत आहे. या दूषित पाण्यामुळे कावीळ, उलट्या, जुलाब यासारखे आजार होण्याची शक्यता असल्याने येथील रहिवाश्यांचे आरोग्य धाेक्यात असल्याचे ठाणे काँग्रेस चे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी स्पष्ट केले.
ठाणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात विविध ठिकाणी जलवाहिन्या फुटल्या आहेत तर काही ठिकाणी, जलवाहिन्यांची दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे कमी दाबाने पाणी पुरवठा हाेत आहे. दरम्यान नळास अति दूषित पाणी येणार असल्यास ते पिणे टाळावे, औषधांचा वापर करावा व काही दिवस पाणी उकळून व गाळून पिण्यासंबंधी नागरिकांना जाहीर आवाहन करत योग्य त्या उपाय योजना महापालिकेने करणे गरजेचे असल्याचे पिंगळे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले.
पुरवठा हाेत असलेल्या पाण्याचा रंग व चव बदलली असल्याने त्याचे नमुने घेऊन त्याची चाचणी होणे गरजेचे असल्याचे मागील आठवड्यातच आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतरही महापालिकेकडून मुंब्र्यात दुषित पाणीपुरवठा सुरूच आहे. हा पाणीपुरवठाही दिवसांतून केवळ दोनच तास होत आहे, त्यामुळे पालिकेने याकडे गांभीर्यार्ने लक्ष देऊन शुध्द व पिण्यायोग्य पाणी पुरवठा करण्याची मागणी िपंगळे यांच्याकडून केली जात आहे.