बदलापूर : गेल्या तीन महिन्यांपासून वेतन रखडल्याने आर्थिक संकटात सापडलेले कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे कंत्राटी सफाई कामगार कोरोनाच्या विळख्यातही अडकू लागले आहेत. आतापर्यंत तीन कंत्राटी सफाई कामगारांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. असे असतानाही गेल्या तीन महिन्यांपासून कंत्राटी सफाई कामगारांना त्यांचे हक्काचे वेतन मिळाले नसल्याचा तसेच पावसाळी व सुरक्षा साधने उपलब्ध होत नसल्याचा समोर आले आहे.
कुळगाव बदलापूर नगर परिषद हद्दीत सुमारे 350 कंत्राटी सफाई कामगार साफसफाई व स्वच्छतेचे काम करीत आहेत. या कंत्राटी सफाई कामगारांना मे महिन्यापासून आतापर्यंतचे म्हणजे तब्बल तीन महिन्यांचे वेतन संबंधित ठेकेदारांकडून देण्यात आलेले नाही. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे या कामगारांना कठीण झाले आहे. तरीही कोरोनाच्या कठीण काळात वेतन नसतानाही हे कामगार शहर स्वच्छ ठेवण्याचे काम करीत आहेत. विशेष म्हणजे आतापर्यंत तीन कंत्राटी सफाई कामगारांना कोरोनाची लागण झाली असून यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. असे असतानाही या कंत्राटी सफाई कामगारांना त्यांचे तीन महिन्यांचे थकित वेतन तसेच पावसाळी साधने व सुरक्षा साधने उपलब्ध होत नसल्याचा आरोप भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस लक्ष्मण कुडव यांनी केला आहे.
नियमानुसार ठेकेदारांनी त्यांच्या मार्फत काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या बँक खात्यात दरमहा १० तारखेच्या आत वेतनाची रक्कम जमा करणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास प्रिन्सिपल एम्प्लॉयर या नात्याने नगर परिषद प्रशासनाने याबाबत संबंधित ठेकेदारांना आदेश दिले पाहिजेत. त्यानंतरही त्यांनी वेतन अदा न केल्यास नगर परिषद परिषद प्रशासनाने ठेकेदारांचे बिल थांबवून वेतनाची रक्कम थेट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली पाहिजे. मात्र नगर परिषद प्रशासनही त्याकडे सोयीस्कर डोळेझाक करीत असल्याचाही आरोप कुडव यांनी केला आहे. दोन दिवसात या कामगारांना त्यांचे तीन महिन्यांचे वेतन अदा न झाल्यास नगर परिषद कार्यालयासमोर कामगारांसह आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.
'' कंत्राटी सफाई कामगारांना तातडीने वेतन देण्याबाबत संबंधित कंत्राटदारांना आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार ठेकेदारांनी कामगारांना वेतन न दिल्यास नगर परिषद प्रशासनाकडून याबाबत कार्यवाही केली जाईल. कामगारांच्या पावसाळी व सुरक्षा साधनांच्या बाबतीतही चौकशी करून योग्य ती कार्यवाही केली जाईल.