मीरारोड - भाईंदर येथील शासनाच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील ठेकेदाराकडील सुमारे १४० कर्मचाऱ्यांना एप्रिल व मे महिन्याचे वेतन मिळाले आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना दिलासा मिळाला आहे.
भीमसेन जोशी शासकीय रुग्णालयावर अनेक गरीब, गरजू रुग्ण उपचारासाठी अवलंबून आहेत. फोकस फॅसिलिटी ह्या ठेकेदार मार्फत रुग्णालयात परिचारिका, वॉर्ड बॉय, तंत्रज्ञ, शिपाई, वाहन चालक आदी सुमारे १४० कंत्राटी कर्मचारी काम करतात. ठेकेदाराचे कंत्राट मार्च २०२३ मध्येच संपलेले असताना शासनाच्या आरोग्य विभागाकडून अत्यावश्यक वैद्यकीय सेवा असताना देखील वेळीच मुदतवाढ दिली गेली नाही. वा दुसरा ठेकेदार नेमला नाही.
परिणामी काम करून देखील कंत्राटी कर्मचाऱ्यांना एप्रिल , मे , जुन ह्या तीन महिन्याचा पगार दिला नव्हता . तीन महिने पगार न मिळाल्याने शाळा - कॉलेज सुरु झाल्याने मुलांचा खर्च , घरखर्च , कर्जाचे हप्ते , कामावर जाण्यासाठीचा प्रवास खर्च भागवणे देखील अवघड झाल्याने कर्मचारी हवालदिल झाले होते. अनेकांना तर प्रवासाचे पैसे नाहीत म्हणून कामावर येत आले नाही . काहींनी एकत्रित रजा घेत काम बंद केले जेणेकरून आरोग्य सेवा विस्कळीत झाली.
वास्तविक शासनाकडून निधी येण्यास विलंब झाला तरी ठेकेदाराने त्याच्या कर्मचाऱ्यांना पगार दिला पाहिजे होता. परंतु ठेकेदार पगार देत नसल्याने कमर्चाऱ्यांची ओढाताण होऊन त्यात शासनाची बदनामी होत असल्याचा सूर देखील आळवला जात होता. कारण पूर्वीच्या राजश्री शाहू सेवा संस्था सोबतच्या करारात शासना कडून निधी विलंबाने आला तरी ६ महिन्यापर्यंत ठेकेदाराने अगार देण्याची अट होती. मात्र फोकस फॅसिलिटी ह्या ठेकेदाराला ठेका देताना ती अट काढून टाकण्यात आली.
श्रमजीवी कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष सुलतान पटेल यांनी सदर प्रकरणी शासनास पत्र देत कर्मचाऱ्यांचा तात्काळ पगार करावा व नेहमीच होणारी रखडपट्टी थांबवावी अशी मागणी करत बेजबाबदार अधिकारी व ठेकेदारावर कारवाईची मागणी केली होती. आमदार गीता जैन यांनी मुख्यमंत्र्यांपर्यंत पगाराबाबत मागणी केली होती. त्यातच नवीन रुग्णालयांच्या खर्चासाठी नवीन लेखाशिर्ष असल्याने निधी वितरित होण्यात विलंब होतो असे सांगितले जात आहे. आता शासनाने ठेकेदारास ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ दिली असून त्याला देयक सुद्धा अदा केले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आता एप्रिल व मे ह्या दोन महिन्यांचा पगार मिळाला असून जून महिन्याचा पगार सुद्धा लवकरच दिला जाईल असे सांगण्यात आले.