लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कल्याण-डोंबिवलीतील फेरीवाल्यांचा प्रश्न निकाली काढण्यात पालिकेची यंत्रणा हतबल ठरल्यानंतर आता फेरीवाले हटविण्यासाठी पालिका प्रायोगिक तत्वावर कंत्राट देईल. बाऊन्सर नेमेल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांनी सभागृहात दिली. कल्याण पश्चिम आणि डोंबिवली पूर्व येथे दोन महिने हा प्रयोग केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाचा मुद्दा मंगळवारच्या महासभेत गाजला. शिवसेनेचे नगरसेवक दीपेश म्हात्रे आणि मनसेचे नगरसेवक प्रभाकर जाधव यांच्या सभा तहकूबी सूचनेवरील दीर्घ चर्चेनंतर महासभा तहकूब करण्यात आली. युवासेनेच्या आंदोलनानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक वामन म्हात्रे यांनीही दर सोमवारी लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. त्यानंतर सभा तहकूबीवर सर्वपक्षीय नगरसेवकांनी अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणावर झोड उठविली. चर्चेच्यावेळी दीपेश म्हात्रे यांच्यासह वामन म्हात्रे यांनीही प्रशासनावर हल्लाबोल केला. फेरीवालाप्रश्नी वारंवार सभा तहकूबी मांडण्यात आली. परंतु फरक पडलेला नाही, याकडे सर्व नगरसेवकांनी लक्ष वेधले. टोपली घेऊन भाजी विकणाऱ्या स्थानिकांना आमचा विरोध नाही. परंतु मुंब्रा आणि कळवा भागातून मोठ्या प्रमाणात गुंड प्रवृत्तीचे लोक येथे येऊन फेरीवाल्याचा व्यवसाय करत आहेत. विरोध करणाऱ्या दुकानदारांना मारहाण केली जाते. पण पोलिस तक्रार दाखल करून घेत नाहीत. यामागे मोठे रॅकेट सक्रि य असून यात गावगुंड, पोलीस आणि महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी सहभागी असल्याचा आरोप दीपेश म्हात्रे यांनी केला. आंदोलने छेडूनही अतिक्रमणे जैसे थे असतील, तर आम्हीही आणखी गुन्हे अंगावर घ्यायला तयार आहोत, असे आव्हान त्यांनी प्रशासनाला दिले. अतिक्रमणप्रकरणी जोपर्यंत अधिकारी निलंबित होत नाही; तोपर्यंत महासभा चालवू नका, अशी मागणी त्यांनी महापौरांकडे केली. नगरसेवक वामन म्हात्रे यांनी फेरीवाला हटविण्यात यशस्वी ठरलेले शैलेश आणि मनीषा धात्रक या दाम्पत्याचे अभिनंदन केले. रेल्वे स्थानक परिसरात ५०० मीटरच्या आवारात फेरीवाला बंदी असतानाही बिनदिक्कत व्यवसाय सुरू असून प्रशासनाकडून न्यायालयाचा अवमान करण्यात आल्याकडे म्हात्रे यांनी लक्ष वेधले. प्रभाग अधिकारी परशुराम कुमावत आणि पथकप्रमुख संजय कुमावत यांना वाहनचालकांकडून पैसे वसूल करून दिले जातात, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. पथकप्रमुख कुमावत हे गेली १० ते १२ वर्षे एकाच ठिकाणी कार्यरत असून त्यांना तत्काळ तेथून हटविण्यात यावे, अशीही मागणी अन्य नगरसेवकांकडून करण्यात आली. त्यावर तसे निर्देश महापौरांनी अतिरिक्त आयुक्तांना दिले. वामन म्हात्रे यांचे उपोषण फेरीवाल्यांविरोधात होते की हप्तेखोरांविरोधात, असा खोचक सवाल मनसेचे गटनेते प्रकाश भोईर यांनी केला. लष्कर आले तरी आम्ही हटणार नाही, ही मुजोरी फेरीवाल्यांमध्ये प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे आली असून जर हॉकर्स आणि पार्किंग पॉलिसी राबविली; तर फेरीवाला अतिक्रमणाची स्थिती उद््भवणार नाही, असे विरोधी पक्षनेते मंदार हळबे म्हणाले. फेरीवालाप्रकरणी ठोस कारवाई करा; अन्यथा आम्हालाही हातात दांडके घ्यावे लागतील, असा इशारा मनसेचे नगरसेवक प्रभाकर जाधव यांनी दिला. पक्षीय राजकारण आणू नकातहकुबी वारंवार मांडल्या जातात, परंतु ठोस निर्णय अथवा कृती होत नाही. ज्यांचा महापौर बसला आहे, तेच नगरसेवक आंदोलन छेडत आहेत. महासभेत येऊन बोलावे, अशी इच्छा आता राहीलेली नाही. जोपर्यंत ठोस कृती होत नाही, तोपर्यंत महासभा चालवू नका, असे मत भाजपाचे नगरसेवक राहुल दामले यांनी मांडले. यावर पक्षीय राजकारण यात आणू नका, असे उत्तर शिवसेनेचे नगरसेवक विश्वनाथ राणे यांनी दिले. बाउन्सर ठेवणार फेरीवाले हटविण्यासाठी कंत्राट देताना बाउन्सर नेमून अतिक्रमणाची समस्या निकाली काढू, असे मत अतिरिक्त आयुक्त घरत यांनी मांडले. याला मान्यता देताना महापौर देवळेकरांनी सद्यस्थितीत ठोस कारवाई झाली पाहिजे, असे आदेश घरत यांना दिले. दीपेश म्हात्रे यांना एक कोटीच्या हमीपत्राची नोटीस बजावणाऱ्या पोलीस यंत्रणेचाही महापौरांनी निषेध केला.फेरीवाल्यांचा प्रश्न सोडवण्यात पालिका अपयशी ठरल्याचे वास्तव मांडणारी थेट छायाचित्रे प्रसिद्ध केल्याबद्दल शिवसेनेचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी महासभेत ‘लोकमत’चे विशेष अभिनंदन केले. ‘लोकमत’चा अंक सभागृहात दाखवत म्हात्रे यांनी या प्रश्नावर आपली भूमिका मांडली आणि ‘लोकमत’चे छायाचित्रकार आनंद मोरे यांचे कौतुक केले.
फेरीवाले हटविण्याचेही कंत्राट
By admin | Published: June 21, 2017 4:43 AM