भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेने शहरातील सफाईसह उद्यान विभागात कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांना सतत मागणी करुनही वेळेत गणवेश व सुरक्षा साहित्य दिले जात नाही. याच्या निषेधार्थ कामगारांनी २५ जूनला श्रमजीवी कामगार संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली पालिका मुख्यालयात अर्धनग्न अवस्थेत चड्डी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.पालिकेने सफाईसह उद्यानांची निगा राखण्यासाठी १६०० व २६० असे एकूण १८६० कामगार कंत्राटावर आहेत. या कामगारांना दरवर्षी प्रत्येकी सहा महिन्यात एक जोडी गणवेश मिळणे अपेक्षित असतानाही गेल्या सहा वर्षात या कामगारांना केवळ तीन जोडीच गणवेश दिला आहे.मागील स्वच्छता सर्वेक्षणाच्यावेळी आलेल्या केंद्रीय पथकाला पालिकेचा स्वच्छ व तत्पर कारभार दाखवण्यासाठी प्रशासनाने केवळ १२ जोडीच नवीन गणवेश खरेदी केले होते. तेच गणवेश पथकाच्या भेटीच्यावेळी उपस्थित कामगारांच्या अंगावर तात्पुरते चढवल्याचा गौप्यस्फोट संघटनेचे पालिका युनिट अध्यक्ष मंगेश पाटील यांनी केला आहे. यंदा नालेसफाईच्यावेळी प्रशासनाने नेते व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटीदरम्यान तात्पुरत्या स्वरुपात नियुक्त केलेल्या कामगारांना गमबूटखेरीज हातमोजे व मास्क केवळ दिखावूपणासाठी दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कंत्राटी कामगारांना गमबूट, मास्क व हातमोजे दिले नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.प्रशासनाने या साहित्यांसह रेनकोट अद्याप कामगारांना दिलेले नाहीत. रस्ता साफ करण्यासाठी दर आठवड्यात किमान दोनवेळा झाडू व यंदा पावसाळी सॅण्डल वितरीत करणे अपेक्षित असताना १५ दिवसात एकदाच झाडू दिला आहे. कचरा गोळा करण्यासाठी पालिकेने प्लास्टिकचे डबे पाच वर्षात एकदाच दिले असल्याचे पाटील यांनी सांगितले.
कंत्राटी सफाई कामगारांचा आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 11:50 PM