लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे :ठाणे महापालिकेच्या कंत्राटी कामगारांना सहा महिन्यांची थकीत फरकाची रक्कम दुप्पटीने अदा करण्याचे आदेश प्राधिकारी, किमान वेतन अधिनियम १९४८ तथा सहाय्यक कामगार आयुक्त, ठाणे यांनी दि.१२ ऑक्टोबर २०२२ रोजी पारीत केले आहे. या आदेशानुसार अर्जदार ३७ कर्मचाऱ्यांना एकूण १५ लाख ६५ हजार सातशे साठ रूपये अर्थात सरासरी सुमारे चाळीस हजार रूपये प्रत्येकी मिळणार आहे. कंत्राटदार मे. विजया कंस्ट्रक्शन कंपनी अथवा मूळ मालक ठाणे महानगरपालिका प्रशासनाने ही रक्कम अदा करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
या प्रकरणात श्रमिक जनता संघ युनियनचे सरचिटणीस जगदीश खैरालिया यांनी कामगारांची बाजू मांडली होती. कंत्राटदार तर्फे श्री तानाजी जाधव (वकील) महापालिका प्रशासनातर्फे विधी सल्लागार अनुश्री गव्हाणे यांनी काम पाहिले. प्राधिकारी, किमान वेतन अधिनियम १९४८ म्हणून सहाय्यक कामगार आयुक्त श्री चेतन जगताप यांनी काम पाहिले.
ठाणे महापालिकेच्या कळवा प्रभागातील व्हॉल्वमन पदावरील कर्मचाऱ्यांना मे.विजया कंस्ट्रक्शन कंपनीचा ठेकेदार तुटपुंज्या वेतनावर राबवून घेत असल्याने श्रमिक जनता संघ युनियन सरचिटणीस जगदीश खैरालिया यांनी कामगारांच्या फेब्रुवारी २०२१ ते जुलै २०२१ या सहा महिन्यांच्या किमान वेतनाचे थकीत फरकासाठी किमान वेतन अधिनियम १९४८ नुसार दि. ३०/०८/ २०२१ रोजी हा दावा दाखल केला होता. सुमारे वर्षभराच्या सुनावणी नंतर कामगारांना न्याय मिळाल्याने कामगार आनंद व्यक्त करत आहेत. कामगारांना सदरची रक्कम दिवाळीच्या आगोदर वाटप करून कामगारांची दिवाळी गोड करावी.अशी मागणी युनियन तर्फे करण्यात आली आहे.
टक्केवारी प्रथा थांबवल्यास कंत्राटदारांवर अंकुश शक्य!
ठाणे महापालिकेतील विविध खात्यात कंत्राटी कामगारांना कायदेशीर वेतन, भत्ते, पीएफ, कामगार विमा योजना, बोनस आणि ग्रेच्युऐटी आणि सुरक्षा साहित्यासाठी आदी सुविधांसाठी ठाणे महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थांना लागू किमान वेतन व त्यावर ४६ टक्के लेव्हीची रक्कम ठेकेदाराना अदा करते. त्या त्या विभागाचे अधिकार्यांची मेहेरनजर मुळे ठेकेदारांना मोकळे रान मिळते. ठाणे महापालिकेचे नूतन आयुक्त डॉ अभिजित बांगर यांनी सर्व खाते प्रमुख व संबंधित कंत्राटदारांवर अंकुश लावण्यासाठी योग्य भूमिका घेऊन कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देतील. अशी अपेक्षा कामगार नेते युनियनचे सरचिटणीस जगदीश खैरालिया यांनी व्यक्त केली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"