ठाणे : कॅडबरी जंक्शन ते नितीन कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर बांधकाम सुरू असलेल्या १२ फूट खोल नाल्यात कोसळून प्रसाद देऊलकर (३५, रा. दिवा, ठाणे) या दुचाकीवरील जीम प्रशिक्षकाचा (इन्स्ट्रक्टर) मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी अभिजित बुराळकर (३६, रा. कांदिवली, मुंबई) या बांधकाम ठेकेदाराला वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केली आहे.
ठाण्यातील सावरकरनगर येथील मित्राकडे काही कामानिमित्त आलेला प्रसाद मंगळवारी पहाटेच्या सुमारास मुंबई-ठाणे पूर्व द्रूतगती राष्ट्रीय मार्गालगत असलेल्या कॅडबरी जंक्शन ते नितीन कंपनीच्या दिशेने जाणाऱ्या सेवा रस्त्यावरून जात होता. याच मार्गावर क्रिटिकेअर रुग्णालयाजवळ अभिजीत या अभियंत्याच्या देखरेखीखाली नाल्याचे बांधकाम सुरू आहे. याठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने पुरेसे बॅरिकेट्स लावलेले नव्हते. शिवाय, याठिकाणी सुरक्षारक्षकही नव्हता. त्यामुळे या रस्त्याच्या खोदकामाचा अंदाज न आल्यामुळे १२ फूट खोल नाल्यात कोसळून देऊलकर यांचा मृत्यू झाला. या घटनेला कारणीभूत असलेला ठेकेदार अभिजित याच्याविरुद्ध कलम ३०४- अ नुसार हलगर्जीपणा तसेच मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय ढोले यांच्या पथकाने त्याला मंगळवारी अटक केली आहे. त्याला १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
........................