ठाणे : तीनहात नाका या सर्वाधीक वाहनांची वर्दळ असलेल्या सिग्नलच्या ठिकाणी दृष्टीहीन व्यक्तींसाठी ग्रीन सिग्नल संकल्पना पालिकेने राबविण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यानुसार यासाठी निविदा देखील काढण्यात आली होती. परंतु त्या निविदेला प्रतिसादच मिळत नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे पुन्हा दुसºयांदा राबविण्यात येत असल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली.
ठाणे वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विनयकुमार राठोड यांनी एक नवीन संकल्पना पुढे आणली होती. ठाणे वाहतूक पोलिसांकडून राबविण्यात आलेल्या वाहतुक सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे काम केले गेले. त्याच वेळेस ही संकल्पना राबविण्याचा विचार आला. त्यानुसार शहराच्या चौकातील रस्ते नागरिकांना सुरक्षितपणे ओलांडता यावेत, यासाठी उपाययोजना करण्यात येतात. असे असले तरी दृष्टीहिन व्यक्तिंना रस्ता ओलाडंताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याच धर्तीवर शहरातील दृष्टीहीन व्यक्तींना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता यावा या उद्देशातून सर्वाधिक वर्दळीच्या तीन हात नाका चौकात ग्रीन सिग्नल यंत्रणा उभारणीचा प्रस्ताव त्यांनी पालिका प्रशासनाला सादर केला होता.
या प्रस्तावास ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी प्रशासकीय सभेत नुकतीच मान्यता दिली. त्यासाठी सद्यस्थितीत असलेल्या सिग्नल यंत्रणेत सुधारणा करण्यात येणार आहे. या मार्गावरील वाहतूक सुरू आहे की रोखून धरली आहे, हे समजण्यासाठी बिपरची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच रस्ता ओलांडण्याची मार्गिका समजावी यासाठी या मार्गिकेवर विशिष्ट स्वरुपाच्या फरशी बसविण्यात येणार आहे. या फरशीमुळे दृष्टीहीन व्यक्तींना पायाच्या स्पशार्ने किंवा हातातील काठीने मार्गिकेवरूनच जातो आहे की नाही, हे समजणार आहे. या कामासाठी १५ लाख रुपये खर्च करण्यात येणार असून याठिकाणी प्रायोगिक तत्वावर ही योजना राबविण्यात येत आहे.
या मान्यतेनंतर ग्रीन सिग्नल यंत्रणेच्या उभारणीसाठी पालिकेने निविदा प्रक्रीया राबविण्यास सुरूवात केली. निविदा सादर करण्याची अंतिम मुदत २० फेब्रुवारीपर्यंत होती. यामध्ये केवळ तीन निविदा पालिकेला प्राप्त झाल्या असून त्यातील दोन ठेकेदारांच्या निविदा तांत्रिक कारणास्तव बाद झाल्या. केवळ एकच निविदा प्राप्त झाल्याने पालिकेने पुन्हा नव्याने निविदा राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यास किती प्रतिसाद मिळतो, हे येत्या काळातच स्पष्ट होईल.