ठाणे : ठाणेकरांच्या सेवेत प्रदूषणविरहित बस सहभागी करून घेण्यासाठी साडेतीन वर्षांपूर्वी १०० इलेक्ट्रिक बस घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, या काळात एकच बस दाखल झाल्याने संबंधित कंत्राटदाराचा ठेका रद्द करण्याची मागणी भाजपचे नगरसेवक मिलिंद पाटणकर यांनी महासभेत केली. त्यावर नियमानुसार १५ दिवसांची वाट पाहून त्यानंतर पुढील प्रक्रिया करण्याचे आश्वासन महापालिकेच्या विद्युत विभागाने बुधवारी महासभेस दिले.ठाणे महापालिकेच्या सेवेत इलेक्ट्रिक बस सामील होणार होत्या. त्या केव्हा येतील, असा सवाल पाटणकर यांनी यावेळी केला. यासंदर्भात विद्युत विभागाचे प्रमुख विनोद गुप्ता यांनी १०० इलेक्ट्रिक बस घेण्यासंदर्भात साडेतीन वर्षांपूर्वी प्रस्ताव मंजूर केल्याचे सांगितले. पीपीपी तत्त्वावर या बस घेतल्या जाणार होत्या. त्यानुसार, त्याने सुरुवातीला एक बस पालिकेला दिली होती. त्यानंतर, टप्प्याटप्प्याने १० अशा स्वरूपात वर्षभरात १०० बस देणार होता. परंतु, त्याने उर्वरित ९९ बस दिलेल्या नाहीत. २० एप्रिल २०२० पर्यंत या बस सहभागी होतील, असेही सांगण्यात आले होते. परंतु, अद्यापही या बस आलेल्या नाहीत.
तीनवेळा बजावली नोटीस -संबंधित ठेकेदाराला तीन वेळा नोटीसही बजावण्यात आलेली आहे. आता पुन्हा नोटीस बजावल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यावर संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द करण्याची मागणी पाटणकर यांनी केली. बसच मिळत नसतील, तर ठेकेदाराचे लाड कशासाठी, असा सवालही त्यांनी केला. दरम्यान, जर बस सहभागी होत नसतील, तर कायदेशीर प्रक्रिया पाहून ठेका रद्द करण्याचे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी दिले.