ठाणे : " नवी पिढी घडताना जुन्या पिढीचे ऋण विसरून चालणार नाही. आदर्श पिढी घडविण्यासाठी आजी - आजोबांचे योगदान फार महत्वाचे असते. त्यांच्यामुळेच आपण आहोत ही भावना सतत मनात ठेवून युवकांनी वडीलधाऱ्यांचा मान ठेवला पाहिजे", असे उद्गगार ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी- बेडेकर कला- वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक यांनी काढले.
सामाजिक जबाबदारीच्या जाणिवेतून मानवाधिकार दिनाचे औचित्य साधून विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी - बेडेकर कला- वाणिज्य महाविद्यालय व हेल्पेज इंडिया या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या संवाद - ज्येष्ठ नागरिकांशी' कार्यक्रमात प्राचार्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून हेल्प एज इंडियाचे संचालक प्रकाश बोरगावकर आणि आनंद वृद्धाश्रम (पालघर) तसेच मातोश्री वृद्धाश्रम (खडवली)चे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. प्रज्ञा राजेबहादूर यांच्या प्रास्ताविकाने झाली. या प्रसंगी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्राचार्या.डाॅ. सुचित्रा नाईक पुढे म्हणाल्या “पुढच्या पिढीला आकार देण्यासाठी कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांचे म्हणजेच आजी आजोबांचे अमूल्य आणि महत्वपूर्ण योगदान आहे, या रुपेरी तरुणाईचा काळी पाटी ते संगणकाची काळी पाटी हा प्रवास वाखाणण्याजोगा आहे. मानवाधिकार आणि त्याचबरोबर आपल्या कुटुंबातील अनुभवी आणि ज्येष्ठ नागरिकांप्रती तरुणाईच्या कर्तव्याची त्यांनी जाणीव करुन दिली. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रकाश बोरगावकर म्हणाले,”'आजच्या पिढीने आपल्या हक्काबाबत जरूर जागरूक राहावे, आणि त्याचबरोबर आपले पालक, आजी -आजोबा आणि घरातील ज्येष्ठ कुटुंबिय यांच्याही हक्का बाबतीत जागरूकता दाखवली पाहिजे. सध्याच्या पिढीने स्वतः बरोबरच त्यांच्या पालकांचा देखील विचार केला पाहिजे”. घरातील ज्येष्ठाचे अनुभव आपल्यासाठी कायमच प्रेरणादायी आणि आशादायी राहण्यास मदत करतात असे अनेक उदाहरणासहित त्यांनी विद्यार्थ्यांपर्यंत आपले विचार पोहोचवले.प्रा. मनीषा पांडे यांनी सदर कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रोत्साहनपर आणि ऊर्जादायी खेळाचे आयोजन केले. तर विद्यार्थिनी अजिताने ज्येष्ठ नागरिक कायद्याची ओळख करुन दिली. कार्यक्रमाचे खरे आकर्षण होते ते महाविद्यालयाच्या टॅलेंट अकॅडेमी च्या कौस्तुभ तांबडे, ईशान भट, सूरज, किमया तेंडुलकर, प्रथमेश जोशी, सृष्टी कुलकर्णी आदी विद्यार्थ्यांनी ज्येष्ठ मित्रांशी आपली कला सादर करुन साधलेला संगीतमय संवाद! त्यात सहभागी होऊन ज्येष्ठ मंडळींनी कार्यक्रमाला रंगत आणली. कार्यक्रमाचे नियोजन विद्यार्थीप्रिय प्राध्यापिका डॉ. प्रज्ञा राजेबहादूर यांनी केले होते, महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला.युवराज व दिव्येश यांनी तांत्रिक बाजू सांभाळली. कार्यक्रमाच्या शेवटी, आदितीने सर्व मान्यवरांचे आणि प्रमुख अतिथींचे आभार व्यक्त केले. आणि पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.