ठाणे :कळवा येथील खारेगाव भागात असलेल्या शासनाच्या खारलॅंड जागेवरून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आ. जितेंद्र आव्हाड यांनी या मैदानाला लावण्यात आलेल्या कुलूपाच्या मुद्यावरून थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली. लागलीच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने आव्हाडांना प्रत्युत्तर देत खेळाच्या मैदानाचा वापर लहान मुलांनी केला पाहिजे. आव्हाड या विषयावर विनाकारण राजकारण खेळत असल्याचा आरोप माजी नगरसेवक नजीब मुल्ला आणि पक्षाचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला. या मैदानाच्या जागेतून लाखोंची लूट केली जात असून शासनाला एकही पैसा भरला जात नसल्याचा आरोप त्यांनी केला.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मैदानाला कुलूप ठोकल्याबद्दल आव्हाडांनी जाब विचारला. पवार यांनी मैदानाला कुलूप ठोकण्यास सांगितल्याचे ते म्हणाले.
क्रिकेट बंद करणे ही आमची भावना नसून येथील सर्वच मुलांना या मैदानाचा वापर करण्यास मिळावा, अशी अपेक्षा असल्याचे ते म्हणाले. त्यातही या मैदानाच्या ठिकाणी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स व्हावा, अशी इच्छा आव्हाडांचीच होती. परंतु त्याची अंमलबजावणी त्यांनीच केली नसल्याचा दावा मुल्ला यांनी केला. येथील अनिरुद्ध अकॅडमी पैसे घेते का नाही? ते आव्हाडांनी आधी स्पष्ट करावे असे आव्हान त्यांनी दिले.
सामाजिक न्याय विभागाच्या जागेवर कार्यालय -
खारेगाव, कावेरी सेतू येथे उभारण्यात आलेले राष्ट्रवादीचे कार्यालय हे सामाजिक न्याय विभागाच्या जागेवर असून त्याच्या बाजूला ७५ लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेले वाचनालय अनधिकृत असल्याचा दावा परांजपे आणि मुल्ला यांनी केला. तसेच कळवा रेल्वे स्टेशनबाहेर पार्किंगच्या नावाखाली वसुली केली जात त्याची चौकशी करण्याची मागणी केली.