सदानंद नाईक
उल्हासनगर : बाबा प्राईम हॉलमधील शहर काँग्रेसच्या निवडणूक आढावा बैठकीत पक्षाचे नेते आमदार भाई जगताप व बी एम संदीप यांच्या समोर गुरुवारी पक्षातील पदाधिकाऱ्यांमधील वाद उफाळून येऊन प्रकार धक्काबुक्कीवर गेला. पक्षाचे माजी शहर जिल्हाध्यक्ष राधाचरण करोतीया यांनी याबाबत नाराजी व्यक्त करत वरिष्ठ नेत्यांसोबत संपर्क साधण्याचे संकेत दिले.
उल्हासनगर कॅम्प नं-४ येथील बाबा प्राईम हॉलमध्ये गुरुवारी शहर जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला पक्षाचे केंद्रीय सचिव बी. एम. संदीप, मुंबई अध्यक्ष व आमदार भाई जगताप, प्रदेश महासचिव राणी अगरवाल, पक्षाच्या गटनेत्या अंजली साळवे, माजी शहर जिल्हाध्यक्ष राधाचरण करोतीया, माजी महापौर मालती करोतीया यांच्यासह शहर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रमुख पक्ष नेत्यांनी पक्ष संघटनावाढीसोबतच निवडणुकांबाबतही मार्गदर्शन केले. कार्यक्रम संपल्यानंतर आमदार भाई जगताप हे महापालिकेत कामगार संघटनेच्या कार्यालय उद्घाटन व कामगारांच्या विविध समस्याबाबत महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी यांच्या सोबत चर्चा करण्यासाठी निघाले असता. पक्षातील पदाधिकाऱ्यात शाब्दीक चकमक उडून प्रकार धक्काबुक्कीपर्यंत जाऊन पक्षातील वाद उफाळून आला.
उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्षपदी रोहीत साळवे यांची निवड झाल्यानंतर, साळवे यांनी शहरात कार्यक्रमाचा धडाका सुरू होऊन पक्षात चैतन्य आणले. महापालिका सत्तेत सहभागी असतांनाही चुकीच्या निर्णय विरोधात त्यांनी आवाज उचलून रान पेटविले. तसेच शहरात काँग्रेस पक्ष चर्चेत आणला. अशा वेळी निवडणूक आढावा बैठकीवेळी पक्षाच्या नेत्यांसमोर काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांमुळे वाद चव्हाट्यावर आल्याने, रोहित साळवे यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र, हा वाद क्षणिक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पक्षाचे स्थानिक नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन महापालिका निवडणुकीत निर्णायक भूमिका वठवतील, असा विश्वास रोहित साळवे यांनी व्यक्त केला. पक्षातील वाद उफाळून आल्याने, वरिष्ठ नेते त्यांची समजूत काढतील, असेही ते म्हणाले.