लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - मीरारोडच्या एका नव्या संकुलात गुजराती , मारवाडी यांना प्राधान्य देण्याच्या जाहिरातीवर मनसे , मराठी एकीकरण समितीने विरोध टीका केली . त्या नंतर संबंधितांनी ती जाहिरात हटवून दिलगिरी व्यक्त केली.
समाज माध्यमावर मिलियन एकर्स ह्या सोल एजंट कडून जाहिरात प्रसिद्ध केली होती . त्यात घरासाठी गुजराती व मारवाडी यांना प्राधान्य असे नमूद केले होते . त्या वरून मनसेचे सचिन पोपळे , संदीप राणे यांनी संबंधित मिलियन एकर्स विरोधात संताप व्यक्त करत त्यांच्या कार्यालयात कॉल करून निषेध केला व कारवाईचा इशारा दिला . त्या नंतर मिलियन एकर्स कडून ती जाहिरात हटवण्यात आली व दिलगिरी व्यक्त करण्यात येत असल्याचे पत्र दिल्याचे पोपळे यांनी सांगितले .
दरम्यान सदर जाहिरात मधील बांधकाम प्रकल्प आमदार गीता जैन यांचा असल्याचे मॅसेज व्हायरल करून काहीजणांनी टीका सुरु केली . सदर प्रकार आ. जैन यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी नवघर पोलीस ठाण्यात या विरुद्ध लेखी तक्रार दिली आहे .
सदर पोस्ट हि त्यांची वा त्यांच्या सोनम बिल्डरची नसून राजकीय द्वेष व आपली बदनामी करण्यासाठी तसेच समाजात तेढ निर्माण करण्यासाठी नाहक आपले नाव जोडण्याचे कारस्थान केले आहे . सोनम बिल्डरच्या जुन्या अश्या गीता नगर , गोल्डन नेस्ट , न्यू गोल्डन नेस्ट पासून इंद्रप्रस्थ अश्या अनेक संकुलात मराठी कुटुंबीय सुद्धा मोठ्या संख्येने रहात असून आम्ही कधी असा भेदभाव केला नसताना असे कटकारस्थान करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्याचे आ . जैन म्हणाल्या .