मीरा रोड - भाजपाचे अहमदनगर महापालिकेतील उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यावरुन तीव्र निषेध व्यक्त होऊन छिंदमला अटक झाली असल्याची घटना ताजी असतानाच मीरा भाईंदरमध्ये भाजपाने शिवजयंती निमित्त लावलेल्या बॅनर वरून वादंग निर्माण झाला. मनसे, मराठी एकीकरण समिती, रिपब्लिकन सेना, शिवमावळा संस्था आदींनी भाजपाच्या बॅनरवर महाराजांना चक्क काही वादग्रस्त पदाधिका-यांच्या सोबत एकाच रांगेत स्थान दिल्याने निषेध करत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. वाढता तणाव पाहून पोलिसांनी भाजपाचे वादग्रस्त बॅनर काढायला लावले.
भाजपाच्या वतीने शिवजयंतीनिमित्त शुभेच्छा देणारा लांब आकाराचा बॅनर हा मीरा रोडच्या सिल्वर पार्क जंक्शनवर अनधिकृत म्हणून तोडलेल्या इमारतीवर लावण्यात आला होता. या बॅनरवर एका ओळीने पंतप्राधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार नरेंद्र मेहता, भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे, महापौर डिंपल मेहता, नगरसेवक अरविंद शेट्टी, भाजपाचे संजय थरथरे व फिरोज शेख यांची छायाचित्र असून महापौर व शेट्टी यांच्या छायाचित्रादरम्यान शिवाजी महाराजांचे छायाचित्र आहे.
या बॅनर बद्दल रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष रोहित आसले, शिवमावळाचे नामदेव काशिद, राजेश जाधव, मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख, मनसेचे दिनेश कनावजे, सचिन पोपळे आदींनी आक्षेप घेतला. छत्रपती शिवाजी महाराज आराध्य दैवत असताना त्यांना भाजपाच्या काही वादग्रस्त पदाधिकाऱ्यांच्या रांगेत बसवणे हा महाराजांचा अवमान असून तो कदापी सहन करणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला .
नगरसेवक अरविंद शेट्टीचे तर ऑक्रेस्ट्रा बार-लॉज असून वेश्या व्यवसायप्रकरणी पीटा सह अन्य गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. आमदार मेहता, थरथरे, शेख आदी वादग्रस्त असून त्यांच्यावर देखील गुन्हे तसेच तक्रारी आहेत. अशा वादग्रस्तांसह अन्य पदाधिकाऱ्यांच्या रांगेत महाराजांचे छायाचित्र टाऊन त्यांचा अपमान केला गेला आल्याचा आरोप आंदोलकांनी केला. मराठी एकीकरण समिती, रिपब्लिकन सेनेने या बॅनरप्रकरणी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
बॅनरमुळे महाराजांचा अवमान झाला असून आमच्या भावना दुखावल्या आहेत. भाजपाला महाराज केवळ निवडणूक जिंकण्या पुरते आणि राजकीय स्वार्थासाठी लागतात. पण त्यांचा सन्मान आणि आदर न राखता उलट अवमान केला जात असल्याचे एकीकरणचे देशमुख म्हणाले.
बॅनर काढण्यावरून आंदोलक व नगरसेवक शेट्टी यांच्यात शाब्दिक चकमक झडली. आंदोलकांनी शेट्टीवर कारवाई करा असे सांगत ही सत्तेची मस्ती असल्याचे सुनावले . मीरारोड पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत तो वादग्रस्त बॅनर काढायला लावला. बॅनर बनवणा-याकडून चूक झाली आहे . महाराजांचा आपणास आदरच आहे. पण हे चुकून झाल्याचे झाल्याचे शेट्टी यांनी सांगितले. तर बॅनर काढण्यात आला असून आलेल्या तक्रारी वर योग्य ती कार्यवाही करू असे मीरारोडचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत लब्धे यांनी सांगितले.