उल्हासनगर : हातगाडीवाल्याने पावती फाडण्यावरून ठेकेदारांची कामगारासोबत वाद घालत मध्यस्थी करणाऱ्याला वजनकाटा मारून जखमी केले. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात हातगाडीधारक जितेंद्र माळोदे यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
उल्हासनगर महापालिकेने फेरीवाल्याकडून स्वच्छता कर वसुलीचा ठेका खाजगी ठेकेदाराला दिला. ठेकेदार हातगाडीवाल्याकडून ४० तर टोपली घेऊन धंदा करणाऱ्या फेरीवाल्याकडून २० रुपये दररोज पावती फाडली जाते. ६ हजार पेक्षा जास्त फेरीवाल्यांची नोंदणी महापालिकेकडे झाली असतांना स्वच्छता कर पावती फक्त १२०० ते १३०० फेरीवाल्यांकडून वसुली केली जाते. कॅम्प नं-४ येथील लालचक्की चौकात बुधवारी रात्री साडे वाजता स्वछता कर पावती फादणाऱ्या ठेकेदाराचे निखिल पाटील व संकेत महाजन यांनी हातगाडीचालक जितेंद्र सिताराम माळोदे यांच्याकडे ४० रुपयांची पावती फाडली.
पावती फाडल्यावरून त्यांच्यात शिवीगाळ व हाणामारी झाली. यावेळी मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या वैभव महादेव कुल यांच्या डोक्यावर हातगाडीचालक माळोदे यांनी वजनकाटा फेकून मारल्याने, कुल हे जखमी झाले. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात जितेंद्र माळोदे यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.
महापालिकेकडे ७ हजार पेक्षा जास्त फेरीवाल्याची नोंदणी असतांना वसूल १२०० ते १३०० हातगाडीकडून दाखविली जात आहे. असा आरोप हातगाडीवाल्यांनी ठेकेदारावर केला असून महापालिकेचे लाखोंचे उत्पन्न बुडीत निघाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याप्रकरणी सखोल चौकशीची मागणी फेरीवाल्याकडून होत आहे.