ठाणे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना आणि धनुष्यबाण मिळाल्याने आता सर्वच ठिकाणी या गटाकडून दावा करण्यात आला आहे. त्यानुसार मागील काही महिने शांत असलेला शाखा ताब्यात घेण्याचा वादही पुन्हा पेटणार असल्याचे चिन्हे निर्माण झाली आहेत. ज्या शाखा आमच्या आहेत, त्या आम्ही घेणाराच असा दावा शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. परंतु ही बाळासाहेब ठाकरे किंवा आनंद दिघे यांची अशी शिकवण नव्हती असे सांगत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आव्हान देण्यात आले आहे. त्यामुळे येत्या काळात आता शिवसेना शाखा ताब्यात घेण्यावरुन पुन्हा वादंग निर्माण होण्याची चिन्हे ठाण्यात निर्माण झाली आहेत.
ठाण्यात शिवसेनेच्या सुमारे ११० च्या आसपास शाखा आहेत. आता त्या शाखा देखील शिंदे गटाने आपल्या हाती घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र आम्ही शिवसैनिकच असल्याने या शाखा देखील आमच्याच असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणुक आयोगाने शिंदे गटाला धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव दिले. त्यानंतर शिंदे गटाकडून शिवसेनेच्या कार्यालयांवर ताबा घेतला जात आहे. काही दिवसांपूर्वी ठाण्यात आनंद आश्रम ताब्यात घेण्यावरुन चांगलाच वांदग उठला आहे. आनंद मठ अशी ओळख असलेल्या आनंद आश्रमच्या जागी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आनंद आश्रम असे नाव देण्यात आले आहे. यावरुन उध्दव ठाकरे गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. परंतु आता शिवसेना हीच शिंदे गटाकडे आल्याने आता शाखांवर देखील ताबा घेण्यासाठी शिंदे गटाकडून हालचाली सुरु झाल्या आहेत.
शिंदे गटाकडे सध्या ६७ पैकी ६४ माजी नगरसेवकांचे प्राबल्य आहेत. तर अनेक महत्वाचे पदाधिकारी देखील शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यात आता शिवसेनाच शिंदे गटाला मिळाल्याने शाखाही आमच्याच असा काहीसा दावा केला जात आहे. ठाण्याचा विचार केल्यास शिवसेनेच्या वरीष्ठ सुत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार ठाण्यात शिवसेनेच्या ११० च्या आसपास शाखा आहेत. या शाखांवर जवळपास तेवढेच शाखाप्रमुख आहेत. या सर्वच शाखा आमच्या असल्याचा दावा आता शिंदे गटाकडून केला जात आहे.
शाखा या शिवसेनेच्या आहेत. त्या आमच्या शाखा आहेत. ज्या शाखा आमच्या आहेत, त्या आम्ही घेणार.(नरेश म्हस्के - प्रवक्ते - शिवसेना)
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे नाव त्यांच्याकडून घेतले जात आहे. परंतु त्यांनी ओरबाडून घेण्याचे संस्कार दिलेले नाहीत. तसे झाल्यास हे दुर्देवी म्हणावे लागणार आहे.(केदार दिघे - जिल्हा प्रमुख, उध्दव बाळासाहेब ठाकरे - शिवसेना)