लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाण्यात पहाटे ५ च्या सुमारास वागळे इस्टेट भागातील डिसोझावाडी येथील तळ अधिक चार मजल्याच्या रिकाम्या असलेल्या इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली. त्यानंतर या इमारतीच्या आजूबाजूला असलेल्या सहा इमारती रिकाम्या करून येथील तब्बल १७४ कुटुंबांना बाजूच्या शाळेत स्थलांतरित केले आहे. या रहिवाशांना बाजूच्या अंबिका शाळा आणि एका हॉलमध्ये सध्या ठेवले आहे. या ठिकाणी आमदार, स्थानिक नगरसेवक, माजी नगरसेवक यांच्या माध्यमातून सोयीसुविधा, जेवणाची व्यवस्था केली आहे. परंतु तरीही आम्हाला आमच्या हक्काच्या घरात जाऊ द्या, अशी मागणी या विस्थापित झालेल्या रहिवाशांनी केली आहे.
ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने घटनेचे गांर्भीय लक्षात घेऊन बाजूच्या सहा इमारतींमधील १७४ कुटुंबांना माजी नगरसेवक संजय मोरे यांच्या मदतीने तत्काळ बाजूच्या खासगी शाळेत तसेच हॉलमध्ये स्थलांतरित केले. पहाटेपासून या या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला चहा, नास्ता, पाणी, अंघोळीसाठी पाणी आदींसह इतर व्यवस्था केली आहे, तर दुपारच्या जेवणाची सोय शिवसेना आमदार रवींद्र फाटक यांनी येथील हॉलमध्ये केली आहे. त्यामुळे रहिवाशांनी या सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत.
रात्री मुसळधार झालेल्या पावसामुळे शिव भुवन इमारतीच्या टेरेसवर पाणी साचले होते. त्यामुळे तिचे बीम हलण्यास सुरुवात झाली, तसेच काही भाग कोसळल्याची घटना घडली. रात्री १ ते २ च्या दरम्यान या एका मागून एक घटना घडल्या. त्यामुळे आम्ही घाबरलो आणि तत्काळ स्थानिक पोलीस ठाण्यासह आपत्ती व्यवस्थापन कक्षाला फोन करून याची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेऊन इतर रहिवाशांना सांगून इमारती खाली करून अवघ्या एका तासात आम्हाला सुरक्षितस्थळी हलविले. त्यानंतर आम्हाला चहा, नास्ता, पाणी आदींसह इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत; परंतु बाहेर कोरोनाची साथ सुरू असल्याने सर्वांना अशा प्रकारे एकत्र ठेवल्यामुळे मनात थोडीशी भीती आहे. असे असले तरी आम्ही तोंडाला मास्क लावूनच वावरत आहोत. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालनही करीत आहोत.
महापालिकेने आता दोन दिवसांची मुदत दिली असून, त्या दोन दिवसांत सदरची धोकादायक इमारत तोडण्याची कारवाई केली जाणार आहे. परंतु, आम्हाला आमच्या हक्काच्या घरात जाऊ द्या, अशी मागणी हे रहिवासी करीत आहेत. इतर इमारतींमधून हलविलेल्या कुटुंबांमध्ये लहान मुलांची संख्या अधिक आहे. एका वृद्ध नागरिकाची प्रकृती खालावली आहे. त्यांनादेखील सुविधा उपलब्ध करून दिली आहे. असे असले तरी पावसाची परिस्थिती आणि कोरोना अद्यापही शांत झाला नसल्याने आम्हाला आमच्या घरात जाऊ द्या, अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे.
आम्हाला येथे योग्य त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. चहा, नास्ता, जेवणाचीही सुविधा देण्यात आली आहे. परंतु, आमची एकच मागणी आहे, बाहेरची परिस्थिती पाहता आम्हाला आमच्या हक्काच्या घरात जाऊ द्या!.
(विवेक जोशी, पांडुरग सदन रहिवासी)
पहाटेपासून आम्ही आमची जबाबदारी पार पाडत आहोत. बाजूच्या इमारतींमधील रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. त्यांना चहा, नास्ता, जेवणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
(संजय मोरे - माजी महापौर, ठामपा)
अष्टमी निवास तळ अधिक चार मजल्याची इमारत - ६४ कुटुंब
पाडुरंग सदन तळ अधिक चार - २४ कुटुंब,
श्रीराम निवास तळ अधिक चार - १८ कुटुंब,
श्रीगणेश निवास तळ अधिक चार - २१ कुटुंब,
पांडे दुर्गा निवास तळ अधिक चार - २९ कुटुंब
राम निवास तळ अधिक चार - १८ कुटुंब