सदानंद नाईक
उल्हासनगर : शहरात कोरोना रुग्ण वाढल्याने, आरोग्य सुविधेवर ताण पडून शासकीय प्रसूतीगृह रुग्णालयाचे रूपांतर कोविड रुग्णालयात केले. तर रुग्णालयातील प्रसूती साठी आलेल्या महिलांना मध्यवर्ती रुग्णालयात हलविले. तसेच टाऊन हॉल मध्ये १५० बेडचे ऑक्सिजन सुविधेसह आरोग्य केंद्र सुरू करणार असल्याची माहिती वैधकीय अधिकारी डॉ दिलीप पगारे यांनी दिली.
उल्हासनगरात कोरोना रुग्णाची संख्या वाढत असल्याने, महापालिका आरोग्य सुविधेवर ताण पडला. कोविड रुग्णालय म्हणून नावारूपास आलेल्या साई प्लॅटिनियम रुग्णालय महापालिकाने, दरमहा २० लाख रुपये भाडेतत्वावर घेतले. मात्र २०० बेडच्या रुग्णालयात सामान्य नागरिकांना बेड उपलब्ध होत नसल्याने, अखेर महापौर लिलाबाई अशान, उपमहापौर भगवान भालेराव, आयुक्त डॉ राजा दयानिधी, उपायुक्त अशोक नाईकवाडे, मदन सोंडे, वैधकीय अधिकारी डॉ दलित पगारे आदींनी पुन्हा शासकीय प्रसूतीगृह रुग्णालयाचे रूपांतर कोविड रुग्णालयात करण्याचा निर्णय घेतला. महापौर लिलाबाई अशान, नगरसेवक अरुण अशान यांनी आज कोविड रुग्णालयात रुपांतरीत झालेल्या, शासकीय प्रसूतीगृह रुग्णालयाची पाहणी करून दोन दिवसात रुग्णालय सुरू करण्याची माहिती दिली. तसेच रेडक्रॉस रुग्णालयातील बंद पडलेली ऑक्सीजन सुविधा सुरू केल्याची माहिती अरुण आशान यांनी दिली.
शासकीय प्रसूतीगृहाचे रूपांतर कोविड रुग्णालयात केल्यानंतर, रुग्णालयातील गर्भवती व प्रसूती साठी आलेल्या महिलांना मध्यवर्ती रुग्णालयात हलविण्यात आले. अशी माहिती वैधकीय अधिकारी डॉ पगारे यांनी दिली. यापाठोपाठ महापालिका टाऊन हॉल मध्ये १५० बेडचे आरोग्य केंद्र सुरू करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहेत. येथील सर्व बेड ऑक्सिजन सुविधेयुक्त राहणार आहे. तसेच महापालिकेच्या दोन शाळे मध्ये कोरोना आरोग्य केंद्र सुरू करण्याचे कामही अंतिम टप्प्यात आहेत. दरम्यान कोरोना टेस्टच्या किड्सचा तुटवडा आज शहरात निर्माण झाल्याने, कोरोना चाचणी प्रक्रिया रखडल्याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन कदम यांनी दिली.
ऑक्सीजनच तुटवडा, रुग्णात भीतीचे वातावरण?
शहरातील महापालिका व खाजगी रुग्णालयाला ऑक्सीजनचा पुरवठा करणाऱ्या एस के व बजरंग ऑक्सीजन वितरण कंपनीकडे रायगड जिल्ह्यातील कंपनीकडून नियमित ऑक्सिजन पुरवठा होत नसल्याचे उघड झाले. त्यामुळे खाजगी रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. महापौर लिलाबाई अशान, नगरसेवक अरुण अशान यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे साकडे घातल्यावर, ऑक्सीजनचा पुरवठा पूर्ववत सुरू झाला. तसेच आपत्कालीन परिस्थिती साठी ऑक्सिजनचा साठा काही प्रांगणात करून ठेवल्याची माहिती अरुण अशान यांनी दिली.