ठाणे : ठाणे जिल्ह्यात कामगारांसाठी कोणतेही कोविड रुग्णालय अद्याप सुरू झालेले नाही, अशी खंत व्यक्त करून उल्हासनगर आणि ठाणे येथील कामगार रुग्णालयांचे तातडीने कोविड रुग्णालयांमध्ये रूपांतरित करावे, अशी मागणी ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन (टीसा) च्या वतीने केंद्रीय कामगार मंत्री यांच्याकडे ट्विटरद्वारे केली आहे. जर तिसरी लाट आली तर तिच्यावर नियंत्रण मिळवता येईल, असे म्हटले आहे.
ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक उद्योगधंदे आहेत. त्यामुळे येथे कामगारवर्गही तितकाच आहे. त्यांच्यासाठी ठाणे आणि उल्हासनगर येथे कामगार रुग्णालय आहे. त्यातच कामगार व उद्योजक कोट्यवधी रुपये ‘ईएसआयसी’ला वर्गणी भरतात. परंतु, ठाणे जिल्ह्यात कामगारांसाठी कोणतेही कोविड रुग्णालय नाही. त्यामुळे उल्हासनगर व ठाणे येथील कामगार रुग्णालयांचे तातडीने कोविड रुग्णालयांमध्ये रूपांतरित करण्यास ईएसआयसी (ESIC) ला सांगावे, असे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच जेणे करून तिसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवता येईल, असेही भारताचे केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांच्यासह संसदीय कामगार समिती सदस्य व ESIC सदस्य तथा ठाण्याचे खासदार राजन विचारे व कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे तसेच राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे ट्विटरद्वारे मागणी केली आहे. तसेच लवकर या संदर्भात निवेदनही देण्यात येणार असल्याचे टीसा उपाध्यक्षा सुजाता सोपारकर आणि प्रसिद्धी प्रमुख शिशिर जोग यांनी दिली.