मीरा रोड : मीरा रोड रेल्वे स्थानकासमोर २० वर्षांपूर्वीच्या शांती शॉपिंग सेंटरमधील ७ सार्वजनिक शौचालयांचे चक्क व्यावसायिक गाळ्यांत रूपांतर करून विकल्याप्रकरणी विकासकावर गुन्हे दाखल करण्याची मागणी शांती शॉपिंग सेंटर सहकारी संस्थेने केली आहे. परंतु, महापालिका मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याने विकासक व पालिका यांचे साटेलोटे असल्याचा आरोप आपने केला आहे. दुर्बल घटकांसाठीच्या योजनेतून शांतीनगर ही वसाहत शांती स्टार बिल्डरने विकसित केली आहे. अगदी रेल्वे स्थानकाला लागून बिल्डरने शांती शॉपिंग सेंटर नावाचे व्यावसायिक संकुल १९९३ च्या दरम्यान उभारले होते. २००९ साली गाळेधारकांनी शांती शॉपिंग सेंटर सहकारी संस्थेची नोंदणी केली. सध्या या संस्थेचे ७०० सदस्य आहेत. विकासकाने केवळ एकाच विंगचा भोगवटा दाखला घेतला आहे. तसे असताना त्याने मंजूर नकाशात दाखवलेल्या तळ मजल्यावरील ७ सार्वजनिक शौचालयांचे व्यावसायिक गाळ्यांत रूपांतर केले. त्याची नोंदणी करून विक्री केली असून काही गाळ्यांमध्ये तर व्यवसायदेखील सुरू झाले आहेत. कोट्यवधी रुपयांचा भाव असल्याने हा प्रकार विकासकाने केल्याचा दावा करून संस्थेने महापालिकेकडे वारंवार लेखी तक्रारी केल्या आहेत. परंतु, तक्रारी करूनदेखील महापालिका मात्र कारवाई करत नसल्याने संस्थेचे सदस्य व आम आदमी पार्टीचे मीरा-भार्इंदर संयोजक सुखदेव बिनबन्सी यांनी पालिका व विकासक यांचे संगनमत असल्याचा आरोप केला आहे. विकासकाविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करून त्याला काळ्या यादीत टाका व बेकायदा झालेले बांधकाम तोडा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
शॉपिंग सेंटरमधील शौचालयांचे गाळ्यात रूपांतर करून विक्री
By admin | Published: February 01, 2016 1:14 AM