लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : पंतप्रधानांनी उज्ज्वला योजनेचा दुसरा टप्पा सुरू करून काही अटींमध्ये सवलतही दिली आहे. कोणतीही अनामत रक्कम न भरता अल्पउत्पन्न कुटुंबांना गॅस कनेक्शन मिळणार आहे. मात्र, खरी अडचण नंतर गॅस भरण्याची आहे. गॅसच्या किमती वाढल्याने त्या अल्पउत्पन्न कुटुंबांना परवडत नाही. सद्यस्थितीला एका घरगुती सिलिंडरसाठी ८३५ एवढी मोठी रक्कम मोजावी लागत आहे. यामुळे या अल्पउत्पन्न कुटुंबीयांना आता शक्य नाही. त्यामुळे या उज्ज्वला योजनेच्या जिल्ह्यातील ४४ हजार १५२ महिला लाभार्थी आजघडीला गॅसऐवजी चुलीकडे वळल्या असून त्यावरच स्वयंपाक सुरू आहे.
जिल्ह्यातील शहरी व आदिवासी, दुर्गम भागातील दारिद्र्यरेषेखालील महिलांना शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेद्वारे एलपीजी गॅसचे कनेक्शन मोफत देण्यात आले. त्यासोबत काही रक्कम घेऊन शेगडीही दिली. मात्र, दरमहा गॅस सिलिंडर मोफत देण्याचे नियोजन केले नाही. त्यामुळे दरमहा वाढणाऱ्या गॅसच्या किमती या कुटुंबीयांना परवडणाऱ्या नाहीत. या महागाईच्या डोकेदुखीतून सुटका करून घेत गरीब कुटुंबीय आता लाकडांचा वापर करून चुलींवर स्वयंपाक करीत आहेत. या कुटुंबीयांना रोजगार हमीच्या कामावर २३८ रुपये मजुरी मिळत आहे. त्यात घराचा खर्च करीत असतानाच या गॅस सिलिंडरसाठी ८३५ रुपये भरणे त्यांना शक्यच नाही. सिलिंडरच्या किमती दर महिन्याला त्यांच्या आवाक्याबाहेर जात आहेत. सर्वच ठिकाणी जीवघेणी महागाई आता गरिबांच्या मुळावरच उठली आहे.
सध्याच्या या आर्थिक संकटात सापडलेले परिवार आर्थिकदृष्ट्या सावरण्यासाठी तारेवरची कसरत करीत आहेत. यामुळेच जिल्ह्यातील उज्ज्वला योजनेच्या गॅस कनेक्शनच्या लाभार्थी ४४ हजार १५२ महिलांनी महागडे गॅस सिलिंडर घेण्याऐवजी पारंपरिक पद्धतीच्या चुलीवर स्वयंपाक करण्यास प्रारंभ केला आहे. गॅस सिलिंडरवर मिळणाऱ्या अनुदानाची रक्कमही सध्या मिळत नाही. बँक खात्यावर जमा होणारी अनुदानाची ही रक्कम आता बंद झाली आहे.
-------