कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ‘ब’ प्रभागात कार्यरत असलेल्या महिला सफाई कामगारांना सफाईचे काम न देता महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या घरी स्वयंपाक करण्यासाठी पाठवले जाते. यासंदर्भात आरोग्य निरीक्षकाची तक्रार महिला सफाई कामगारांनी कामगार संघटनेकडे केल्यामुळे हा प्रकार उघड झाला आहे. याबाबत, महापालिका वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे अध्यक्ष चरणसिंग टाक यांनी महापालिकेचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त धनाजी तोरसकर यांच्याकडे याबाबत तक्रार केली आहे. ‘ब’ प्रभागातील आरोग्य निरीक्षक बाळासाहेब कंद हे महिला सफाई कामगारांना सफाईचे काम देण्याऐवजी अधिकाºयांच्या घरी स्वयंपाक करण्यासाठी पाठवत आहेत. रात्री-अपरात्री ते या महिलांना कामाला धाडत असल्याने महिलांनी त्यावर आक्षेप घेतला आहे. महिला सफाई कामगारांनी याप्रकरणी संघटनेकडे दाद मागितली असता टाक यांनी हा विषय उपायुक्तांकडे मांडला. त्यानंतर, हा गंभीर प्रकार उघड झाला आहे.
उपायुक्तांनी त्यावर काहीच कार्यवाही केलेली नाही. यासंदर्भात त्यांचा कार्यभार पाहणारे अधिकारी अमित पंडित यांच्याकडे याविषयी विचारणा केली असता त्यांनी असे पत्रच माझ्यापर्यंत आलेले नाही. याप्रकरणी खुद्द कंद यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन नॉट रिचेबल होता. त्यामुळे त्यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांसंदर्भात त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
महापालिकेने चार प्रभाग क्षेत्रांतील कचरा उचलण्याचे काम खाजगी कंत्राटदार कंपनी आर अॅण्ड डी या कंपनीला दिले आहे. या कंपनीला हा ठेका १०७ कोटींना दिला आहे. या प्रभागांतील कचरा खाजगी कंत्राटदार उचलत आहे. यामध्ये ‘ब’ प्रभागाचाही समावेश आहे. ज्या महिला सफाई कामगारांना अधिकाºयांच्या घरी स्वयंपाक करण्यासाठी पाठवले जात आहे, त्या ‘ब’ प्रभागात कार्यरत आहेत. ‘ब’ प्रभागात कचरा कंत्राटदाराकडून उचलला जात असल्याने या महिला सफाई कामगारांना अन्य प्रभागांत कामासाठी पाठवता येऊ शकले असते.
अशासकीय कामे सांगणे नियमबाह्यसफाई कामाव्यक्तिरिक्त महिलांना अशासकीय कामे सांगणे नियमबाह्य आहे. जे काम दिले आहे. तेच काम त्यांच्याकडून करून घेतले पाहिजे. महापालिकेच्या कार्यालये, प्रभाग अधिकारी कार्यालये आणि प्रभागात महिलांना कामासाठी पाठवू शकतात. अशा प्रकारे घरची कामे करण्यासाठी महिलांना पाठविणे गैर आणि नियमाला धरून नाही असा मुद्दा टाक यांनी उपस्थित केला आहे.