कल्याण : डोंबिवलीतील कोपर दिशेकडील रेल्वे उड्डाणपूल वाहतुकीसाठी सुरक्षित नसल्याने तो बंद करण्यात आला असला तरी या पुलाच्या कामाची निविदा काढण्यातील अडसर अद्याप दूर झालेला नाही. रेल्वेकडे कल्याण-डोंबिवली महापालिकेने सातत्याने पाठपुरावा करुनही त्याला रेल्वे प्रशासनाकडून अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे कोपर पुलाचे काम लांबणीवर पडणार आहे.
कोपर दिशेला उड्डाणपुलाच्या उभारणीचे डिझाइन रेल्वेकडे १७ आॅक्टोबरला पाठवले होेते. त्यांच्याकडून त्याला मंजुरी दिली जात नसल्याने पुढील कार्यवाही महापालिकेस करता येत नव्हती. रेल्वेकडून दखल घेतली जात नसल्याने मनसेचे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेतल्यावर डिझाइनला दोन दिवसात मंजुरी दिली जाईल, असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात ८ नोव्हेंबरला या डिझाइनला मंजुरी दिली गेली. त्यानंतर निविदा काढण्याचा मार्ग मोकळा होईल, असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
महापालिकेने कोपर पूल तोडण्याची अनुमती मागितली होती. त्याला रेल्वेकडून अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. त्याचबरोबर रेल्वे उड्डाणपूल कशा प्रकारे पाडायचा याबाबत रेल्वेकडून काहीही सांगण्यात आलेले नाही. याशिवाय कोपर पुलासाठी रेल्वेने ५० टक्के व महापालिकेने ५० टक्के रक्कम भरावी, याबाबत महापालिकेकडून रेल्वे प्रशासनासोबत पत्रव्यवहार केला आहे. त्या पत्रालाही रेल्वेकडून अद्याप उत्तर दिले गेलेले नाही. खर्चाचा भार कोणी किती उचलायचा याचे ठरल्यानंतरच निविदा किती खर्चाची काढायची यावर निर्णय घेतला जाणार आहे. रेल्वेकडून पुन्हा काही उत्तर मिळाले नसल्याने कोपर पुलाचा प्रश्न प्रलंबित राहिला आहे.
कल्याणमध्ये स्कायवॉकची केली पाहणी
कल्याण पश्चिमेतील रेल्वे स्थानक ते गुरुदेव हॉटेलच्या दिशेने असलेल्या स्कायवॉकचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे काम सुरू आहे. त्याची प्राथमिक पाहणी मंगळवारी करण्यात आली. अंतिम पाहणी येत्या काही दिवसांत केली जाणार आहे. त्यानंतर हा स्कायवॉक दुरुस्त करायचा की तोडून नव्याने तयार करायचा याविषयी निर्णय घेतला जाणार आहे. स्कायवॉकची निर्मिती २००८ मध्ये सुरु झाली होती. तर, २०१० तो सुरू झाला.मात्र अवघ्या नऊ वर्षांत स्कायवॉकचे लेखापरीक्षण करण्याची वेळ आली आहे. स्कायवॉकची देखभाल दुरुस्ती केली गेली नसल्याने ही वेळ आली आहे, असे बोलले जाते.
‘त्या’ पुलाची डागडुजी होणार
कल्याण ते कसारा मार्गावर रेल्वे मार्गाला समांतर उल्हास नदीवरील पूल हा धोकादायक झाला आहे की नाही याचे स्ट्रक्चरल आॅडीट करण्याचे काम महापालिकेने एका संस्थेला दिले होते. त्याचा अहवाल महापालिकेस प्राप्त झाला असून तो धोकादायक नसून त्याची डागडुजी करण्याची गरज आहे. आॅडीट अहवालानुसार सुचवलेल्या देखभाल दुरुस्तीच्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार केले जाईल . त्यानंतर पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले जाईल, अशी माहिती महापालिकेच्या शहर अभियंत्या सपना देवनपल्ली-कोळी यांनी दिली.