ठाणे : एकेकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रसिद्ध नव्हता. आता काळ बदलला आहे. देशातील परिस्थिती बदलली, त्यामुळे जे खरे मित्र असतात ते टिकतात, मात्र परिस्थितीनुसार मित्र बदलतात. आपली परिस्थिती चांगली म्हणून येणारे जसे मित्र असतात, तसे परिस्थिती चांगली नाही, म्हणून सोडून जाणारे मित्रही असतात; परंतु हे तेवढ्या पुरते असते, हे लक्षात ठेवा, असे सूचक उद्गार सरसंघचालक मोहन भागवत यांनी शुक्रवारी ठाण्यात काढले. भागवत हे आर्थिक परिस्थितीबाबत बोलत असले तरी त्यांची विधाने हा भाजपचा एकेकाळचा मित्र असलेल्या शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला व इशाराही होता. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे श्रोत्यांमध्ये बसून भागवत यांचे हे विचारधन गोळा करीत होते.
पैसा असो की सत्ता ती जितकी एका हातात केंद्रित होईल, तितकी त्याबद्दलची निश्चिंतता होते. केंद्रीकरणाने वाईटच होईल असे नाही, चांगलेही होऊ शकते, ते पैसा व सत्ता कुणाच्या हातात आहे, त्यावरही अवंलबून असते; परंतु आपल्याकडे सगळ्या गोष्टींचे विकेंद्रीकरण करण्याची परंपरा आहे. अर्थशक्तीकरिता सहकार हाही उपाय आहे. धनाची शक्ती हळूहळू सर्वसामान्यांच्या हातात येण्यासाठीची सहकार ही चळवळ आहे; परंतु संघाचे स्वयंसेवक ‘विनासहकार नवी उद्धार, विनासंस्कार नही सहकार’ यावर विश्वास ठेवतात, असे भागवत म्हणाले.
टीजेएसबी सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या सांगता समांरभासाठी भागवत ठाण्यात आले होते. कार्यक्रमास बँकेचे अध्यक्ष विवेकानंद पत्की, उपाध्यक्ष शरद गांगल, व्यवस्थापकीय संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील साठे हे उपस्थित होते. ते म्हणाले, संघाचे स्वंयसेवक सहकार क्षेत्रात बँकिंग व्यवसाय म्हणून आले नाहीत. सेवा म्हणून उतरले. भारतात सहकार हा खूप जुना आहे, सहकार भारतीयांच्या रक्तात आहे. अर्थ हा पुरुषार्थ आहे. आपण लक्ष्मीपूजन करणारे लोक आहोत. पैसा समाज चालावा म्हणून मिळवायचा, असेही ते म्हणाले.