ठाणे : राज्यातील आगामी निवडणुकीसाठी ‘ एकला चलो रे’चा नारा काँग्रेस पक्षाने दिला आहे. परंतु, ठाण्यात पुन्हा कॉंग्रेसमध्ये गटातटाचे राजकारण सुरू झाल्याचे चित्र दिसू लागले आहे. आजही पदाधिकारी एकमेकांचे पाय खेचण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे ठाण्यात स्वबळाचा नारा कितपत यशस्वी होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अशातच आता चार विधानसभानिहाय चार कार्याध्यक्ष आणि अध्यक्ष नेमून त्यांच्यावर आणखी एक कोअर कमिटी नेमावी, असा प्रस्ताव प्रदेश महासचिव मनोज शिंदे यांनी प्रदेशाध्यक्षांकडे सादर केला आहे.
काही दिवसांपासून ठाणे शहर अध्यक्ष बदलण्याचे वारे कॉंग्रेसमध्ये वाहू लागले आहेत. त्यामुळे अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून अध्यक्षपद मिळविण्यासाठी तयारी सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वी प्रदेशचे नेते चंद्रकांत हंडोरे यांच्यासमोरच शहरातील पदाधिकारी एकमेकाविरुद्ध भिडले होते. त्यामुळे शहर कॉंग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा दिसून आली. आता काहींनी आव्हान देत थेट प्रदेश अध्यक्षांकडेदेखील शहर अध्यक्षांविरोधात तक्रार केली आहे. त्यामुळे शहर कॉंग्रेसमध्ये आलबेल सुरू नसल्याचे दिसून आले. दुसरीकडे पक्षनेतृत्वाने ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे. परंतु, ठाण्यात संख्याबळ कमी असतानादेखील कॉंग्रेसमध्ये गटातटाचे राजकारण पुन्हा एकदा उफाळून आले आहे.
या सर्वांवर पर्याय म्हणून ठाणे शहराध्यक्षाच्या जोडीला आठ शिलेदारांची फौज तैनात करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. प्रत्येकी दोघांना एका-एका विधानसभा क्षेत्नाची जबाबदारी दिली जाणार आहे. त्यांच्यावर टाकलेल्या जबाबदारीला त्यांनी योग्य न्याय देऊन जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी निवडून महापालिकेवर पाठविले, तर अशा शिलेदाराला थेट महापालिकेत मागच्या दारांतून सभागृहात पाठवण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसच्या खास सूत्नांनी दिली. पण, त्या आठही शिलेदारांची नावे अद्यापही गुलदस्त्यात आहेत.
दरम्यान, कॉंग्रेसला मजबूत करून गटातटाचे राजकारण मोडीत काढण्यासाठी या अध्यक्ष आणि कार्याध्यक्षांच्या कामांवर देखरेखीसाठी आणखी एक कोअर कमिटी असावी, असा विचार शिंदे यांनी प्रदेश अध्यक्षांकडे मांडला आहे. यामध्ये ठाण्यातील ज्येष्ठ कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांचा समावेश करावा, असेही त्यांनी म्हटले आहे. सुभाष कानडे, राजेश जाधव, प्रदीप राव, राम भोसले आदींसह इतर पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कोअर कमिटी नेमून त्यांच्याकडून शहर अध्यक्षांसह चार विधानसभा अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष यांनादेखील मार्गदर्शन करून पक्षाला बळकटी देता येईल यासाठी प्रयत्न करावेत, जेणे करून ठाणे महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून हे पक्षासाठी फायदेशीर ठरेल, असेही त्यांनी पक्षाध्यक्षांच्या निदर्शनास आणले आहे.