कल्याण : कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी चौकात शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. हा पुतळा कल्याणचे नाक समजले जाते. या पुतळ्याची कोनशिलाच कोसळली आहे. पुतळा परिसरातील देखभाल दुरुस्तीकडे कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे शिवप्रेमींकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
कल्याण शिवाजी चौकात शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा आहे. मात्र, शहरात महाराजांचा अश्वारूढ पुतळा असावा यासाठी शिवसेनेच्या सदस्यांनी पुढाकार घेतला होता. माजी नगरसेवक कैलास शिंदे व रवी पाटील यांच्या पुढाकाराने ३ कोटी रुपये खर्च करून माजी महापौर वैजयंती घोलप यांच्या कार्यकाळात २०१२ मध्ये दुर्गाडी येथे अश्वारुढ पुतळा उभारण्यात आला. त्याचे लोकार्पण २१ एप्रिल २०१३ रोजी करण्यात आले. हा पुतळा म्हणजे कल्याणची शान आहे. पुतळ्याभोवती आकर्षक दिवे आहेत. तसेच हिरवळ आणि त्याच हिरवळीवर पुतळ्याच्या कोनशिला लावलेली आहे. आजमितीस ही कोनशिलाच कोसळली आहे. तसेच पुतळ्या भोवती असलेल्या संरक्षक कठड्यावरील लोखंडी गज वाकलेले आहेत. अनेक वेळा पुतळ्याभोवतालची रोषणाई बंद असते. तसेच पुतळ्याच्या चुबुतऱ्याच्या भोवती असलेल्या उथित्पशिल्पांची फ्रेमही निघण्याच्या बेतात आहे.ही उथित्पशिल्प निकळून पडून शकतात, अशी त्यांची अवस्था झाली आहे. पुतळ्यानजीक महाराष्ट्राचा नकाशा आहे, त्याचीही दुरवस्था झाली आहे.
शिवसेनेचे महानगरप्रमुख विजय साळवी यांनी या प्रकराविषयी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. काळा तलाव येथील बाळासाहेब ठाकरे स्मारकाला महापालिकेकडून सुरक्षा व्यवस्था पुरविली गेली आहे. मात्र, महाराजांच्या पुतळ्याच्या ठिकाणीही महापालिकेने सुरक्षा रक्षक पुरविणे गरजेचे आहे. पुतळ्याच्या देखभाल-दुरुस्तीकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याकडे लक्ष वेधले आहे. महापालिका पुतळा परिसरात शिवप्रेमींना महाराजांच्या पुतळ्याजवळ जाण्यास मज्जाव करते. काही शिवप्रेमी तरुण शिवाजी चौकातील महाराजांच्या पुतळ्याजवळ महाराजांचीआरती करतात. त्याच धर्तीवर दुर्गाडी चौकातही त्यांना महाराजांची आरती करायची इच्छा असून त्यांना प्रवेश नाकारला जातो, याबाबत त्यांनर आश्चर्य व्यक्त केले.
माजी नगरसेवक रवी पाटील म्हणाले की, सुरुवातीला रोषणाई योग्य प्रकारे सुरू होती. त्याठिकाणी सुरक्षा रक्षकही होता. नंतर महापालिकेने त्यात सातत्य ठेवलेले नाही. दुर्गाडी येथील या पुतळ्यासमोर दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी महापालिकेच्या ताब्यातील जागेवर बेकायदा झोपड्या वसल्या आहेत. त्या हटविण्याकडे महापालिका लक्ष देत नाही.
आजपासून दुरुस्ती करणारमहापालिकेच्या बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता रघुवीर शेळके यांच्या अखत्यारीत दुर्गाडी पुतळ्याची देखभाल दुरुस्ती आहे. त्यांच्याकडे या प्रकरणी विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, त्याठिकाणची देखभाल दुरुस्तीचे काम उद्यापासून हाती घेतले जाईल.