मीरारोड - मीरा भाईंदरमध्ये कोरोना रुग्ण संख्येचा स्फोट झाला असून रविवारी तब्बल २९५ नवे रुग्ण सापडले. गेल्या ८ महिन्यातील हा उच्चांक आहे. तर शनिवारी २३४ असे दोन दिवसात ५२९ नवे रुग्ण सापडले आहेत . कोरोना नियमांचे पालन खुद्द पालिका अधिकारी आणि राजकारणीच करत नसल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करा अशी मागणी केली जात आहे .
मीरा भाईंदर महापालिका पदाधिकारी, प्रशासनाचे बहुतांश अधिकारी - कर्मचारी, नगरसेवक व राजकारणी यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे सातत्याने उल्लंघन चालवले आहे . अगदी महापौर, आयुक्त , उपमहापौर, सभागृह नेता आदी पदाधिकारी, अधिकारी - कर्मचारी आदी राजरोस विना मास्क मिरवत आहेत. खुद्द प्रशासकीय अधिकारी आणि राजकारणीच मास्क लावत नसल्याने शहरातील बहुतांश नागरिकांनीदेखील मास्क लावणे सोडून दिले आहे का? असा प्रश्न केला जात आहे.
ओमायक्रॉनचा धोका वाढल्यानंतरही मास्क न लावण्याचा मस्तवालपणा शहरात प्रशासनातील अधिकारी आणि राजकारणी यांनी सुरूच ठेवला आहे. त्यातूनच मास्क न लावणाऱ्यांवर कारवाई करणेदेखील पालिकेने बंद करून टाकले. लोकांना नियम पाळण्याचे उपदेश देणारे राजकारणी आणि अधिकारी स्वतः मात्र विना मास्क फिरत असल्याने कोरोना संसर्ग रोखायचा तरी कोणी व कसा? असे सवाल जागरूक नागरिक करू लागले आहे.
मास्क न लावण्याचा बेजबाबदारपणा आता अंगलट येऊ लागला असून शनिवाच्या एका दिवसात २३४ नवे कोरोना रुग्ण सापडले. तर आज रविवारी तब्बल २९५ नवे कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत चाललेले असतानादेखील महापालिकेने नियमांचे पालन करण्यासाठी कठोर पावले उचलली नाहीत. शहरात मास्क न लावता फिरणारे आणि बाजारांमध्ये होणारी गर्दी पाहता त्यांच्यावर कोणाचेच नियंत्रण राहिलेले नाही .
मुळात या सर्वांस महापौर, आयुक्त, पालिका पदाधिकारी, अधिकारी, नगरसेवक, राजकारणी आदी जबाबदार असून त्यांनीच मास्क घालणे बंद केले व नियमांचे उल्लंघन सातत्याने केल्याने शहरात कोरोनाचा स्फोट झाला आहे. त्यामुळे त्यांच्यावर आधी गुन्हे दाखल करावा व दंड वसूल करा, अशी मागणी जागरूक नागरिकांनी केली आहे.