ठाणे : ठाण्यात कोरोनाचा आलेख मागील काही दिवसांत वरखाली होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या कमी होऊ लागली आहे. त्यातही मागील काही दिवसांत शहरात रुग्णसंख्या १०० च्या आत येताना दिसत आहे. त्यामुळे ठाणेकरांसाठी निश्चितच ही समाधानाची बाब म्हणावी लागणार आहे. ठाण्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९७.८२ टक्के, तर रुग्णदुपटीचा कालावधी हा १४६१ दिवसांवर आला आहे.
कोरोनाची दुसरी लाट आता हळूहळू का होईना, ओसरू लागली आहे. ठाणे महापालिका हद्दीतही महापालिकेने केलेल्या उपाययोजनांमुळे ती आता कमी होताना दिसत आहे. जूनच्या मध्यापासून ठाण्यात कोरोनाची स्थिती नियंत्रणात येताना दिसून येत आहे. कळवा परिसरात १५ च्या आत रुग्ण आढळून येत होते. २१ जून रोजी या भागात ३७ रुग्ण आढळले होते; तर, शहराच्या उर्वरित भागात २० च्या आत रुग्ण होते. कळव्यातील काही भागांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ होऊ लागल्याने महापालिका यंत्रणा सतर्क झाली होती. यानंतर प्रशासनाने कळवा परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्यास सुरुवात केली आणि दोन ते तीन दिवसांत येथील परिस्थिती पुन्हा आटोक्यात आली होती. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शहरामध्ये सक्रिय रुग्णांची संख्या एक हजाराच्या आतमध्ये होती. ७ जुलैनंतर शहरात रुग्णसंख्या वाढू लागली आणि त्यानंतर सक्रिय रुग्णांची संख्या एक हजाराच्या पुढे गेली. सलग तीन दिवस हा आकडा कायम होता. यामुळे शहराची चिंता वाढली होती. रुग्णसंख्येत अचानकपणे वाढ झाल्याने प्रशासनही सतर्क झाले होते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना करण्यास सुरुवात केली होती. तीन दिवसांनंतर पुन्हा रुग्णसंख्या कमी होऊ लागली. आता शहरात नऊशेच्या आसपास सक्रिय रुग्ण आहेत. शहरात दररोज ९० ते ९६ च्या आसपास रुग्ण आढळत आहेत. दिवसाला एक ते दोन मृत्यूंची नोंद होत आहे. यामुळे शहरात कोरोना आटोक्यात असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.
-------
कोरोना आकडेवारी
एकूण रुग्णसंख्या-एक लाख ३४ हजार ७८२
बरे झालेले रुग्ण - एक लाख ३१ हजार ८३८
सक्रिय रुग्ण-८९६
आतापर्यंत झालेले मृत्यू -२,०४८
आतापर्यंत केलेल्या चाचण्या- १७ लाख ९० हजार १४०
रुग्ण दुपटीचा कालावधी- १,४६१