ठाणे - प्रशासनातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या कर्तव्य पारायणता, नि:स्वार्थी भावनेने केलेल्या कामामुळे महालक्ष्मी एक्सप्रेसवरील आपत्ती, कोविड काळातील प्रसंग किंवा निवडणूक काळात केलेले काम असो, या सर्व काळात सहकाऱ्यांनी केलेल्या कामामुळे जिल्ह्याचे नाव राखले गेले आहे. जिल्हाधिकारी असलो तरी सहकाऱ्यांकडे माणूस म्हणून पाहण्याची भूमिका नेहमी ठेवली. त्यामुळे अनेक कठीण प्रसंगावर मात करता आली, अश्या भावना ठाण्याचे माजी जिल्हाधिकारी व नवी मुंबई महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त राजेश नार्वेकर यांनी आज पार पडलेल्या निरोप समारंभात व्यक्त केल्या.
नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी बदली झाल्यानिमित्त जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचा सन्मान आणि नवनियुक्त जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांचा स्वागत सोहळा आज येथील राम गणेश गडकरी रंगायतन येथे झाला. यावेळी सीमा नार्वेकर, स्मिता शिनगारे, अपर जिल्हाधिकारी मनीषा जायभाये, ठाणे जिल्हा जात पडताळणी समितीच्या अध्यक्षा वैदेही रानडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांचे वडील अंबादास शिनगारे यांचा नार्वेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महसूल प्रशासनाच्या वतीने नार्वेकर यांना मानपत्र देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. नवनियुक्त जिल्हाधिकारी शिनगारे यांचाही सपत्नीक सत्कार ठाणे जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आला.
यानिरोप समारंभात नार्वेकर म्हणाले की, जिल्हाधिकारी म्हणून काम करताना चार वर्षांच्या या कालावधीत अनेक चांगल्या वाईट प्रसंग आले. कोरोना काळात ठाणे जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांच्या उत्तम काम व मेहनतीमुळे रेमडेसीविर वाटप किंवा मजुरांना रेल्वेने मूळ गावी पाठविण्यासाठी केलेले नियोजनाचा पॅटर्न देशभर पोहोचला, आदी आठवणी ही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितल्या. ठाण्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी शिनगारे म्हणाले की, राजेश नार्वेकर यांच्या सारख्या सक्षम नेतृत्वामुळेच कोविड काळातही ठाणे जिल्हा उत्कृष्ट कार्य करून अग्रभागी राहिला. मुंबईच्याजवळ असलेल्या ठाणे जिल्ह्यात काम करण्याचे मोठे आव्हान नार्वेकर यांनी आपल्या शांत, सुस्वभावी, निग्रही व संयमी स्वभावाने लिलया पेलले आहे. त्यांनी आपल्या कृतीतून आव्हानांना उत्तर दिले. जिल्हाधिकारी पदाची विश्वासहर्ता वाढविण्याचे काम त्यांनी केले. त्याच्यानंतर आता जिल्हाधिकारी पदावर काम करण्याचे माझ्यासमोर मोठे आव्हान आहे, असेही शिनगारे यांनी यावेळी स्पष्ट केले.
राम गणेश गडकरी रंगायतनच्या सभागृहात सुमारे साडेचार चाललेल्या या कार्यक्रमात जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नार्वेकर व शिनगारे यांच्या विषयीच्या आपल्या भावना भरभरून व्यक्त केल्या. नार्वेकर यांच्या सोबत काम करताना आलेले अनुभव, विविध अडचणींवर त्यांनी काढलेले मार्ग याविषयी भावना अधिकारी, कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या. यामध्ये वैदेही रानडे, अपर जिल्हाधिकारी मनीषा जायभाये, अपर जिल्हाधिकारी शिवाजी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे, उपविभागीय अधिकारी अविनाश शिंदे, जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, आरोग्य विभागाचे सहायक संचालक डॉ. मनीष रेंगे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव, तहसीलदार सर्वश्री जयराज देशमुख, तहसीलदार प्रशांती माने, नायब तहसीलदार दिनेश पैठणकर, अमोल जाधव, गिरीश काळे, सुनील धगळे, गंगाधर आयरे, ऋषिकेश कुलकर्णी यांनी यावेळी नार्वेकर व शिनगारे यांच्या बद्दलच्या भावना व्यक्त केल्या.