ठाणे : कोरोनामुळे अनेक वागदत्त वधू वराना आपला विवाह पुढे ढकलावा लागला आहे. परंतु संघवी आणि बाफना कुटुंबाने आपल्या मुलांचा विवाह रद्द न करता ठरल्या तारखेला त्यांनी घरीच शुभमंगल सावधान केले. ठाण्याचा वर आणि मुंबईची वधू यांचा घरगूती विवाह सोहळा नुकताच संपन्न झाला. विशेष म्हणजे विवाह सोहळा दरम्यान दोघांनी मास्क घातले होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर केले असून सरकारने निर्बंध मात्र कायम ठेवले आहेत. एप्रिल - मे महिन्यात सर्वाधिक विवाह मुहूर्त असतात तसेच, मुलांना शाळेला सुट्टी देखील असते. त्यामुळे अनेक जण या कालावधीत आपल्या विवाहाची तारीख ठरवितात. अनेक कुटुंबांनी आपल्या मुलांची लग्न या उन्हाळी सुट्टीत करण्याचे ठरविले होते. परंतु लॉकडाऊन जाहीर झाले आणि विवाह ठरलेल्या वधू वराना आपल्या विवाहाच्या तारखा पुढे ढकलाव्या लागल्या. सहा महिन्याआधीच लग्न ठरलेल्या संघवी आणि बाफना कुटुंबाने मात्र ना विवाह सोहळा रद्द केला ना तो पुढे ढकलला. त्यांनी ठरल्या तारखेला हा सोहळा पार पडला पण तो ही फक्त घरगुती पद्धतीने. ठाण्याचा राज संघवी आणि रुषाली बाफना यांचा विवाह सहा महिन्यांपूर्वी कुटुंबाच्या संमतीने ठरला होता. त्यांनी 2 मे 2020 ही लग्नाची तारीख ठरवली होती. त्यांचे लग्न खोपोली येथे डेस्टिनेशन वेडिंग पद्धतीने करण्याचे योजिले होते. त्यादृष्टीने त्यांनी लग्नाची सगळी तयारी केली, नातेवाईकांना व्हाट्सऍपद्वारे आमंत्रणही देण्यात आले. परंतु दुर्दैवाने भारतावर कोरोनाचे संकट आले. त्यानंतर सरकारला लॉकडाऊन जाहीर करावे लागले. लॉकडाऊनचा कालावधी वाढतच गेला. नातेवाईकांनी लग्न पुढे ढकलण्याचा सल्ला दिला होता पण आम्ही दोन्ही कुटुंबांनी घरातच लग्न पार पाडण्याचा निर्णय घेतला असे राजचे वडील महेंद्र संघवी यांनी सांगितले. ठरल्या वेळी, ठरल्या तारखेला विवाह करण्याचे पक्के झाल्यावर महेंद्र यांनी पोलिसांना ऑनलाइन अर्ज दिला त्यावेळी सुरुवातीला पोलिसांनी देखील लग्न पुढे ढकलण्याचा सल्ला दिला परंतु आम्हीही त्यांना लॉकडाऊनचे नियम आम्ही मोडणार नाही, तुम्ही सांगाल तितकेच लोक सोबत नेऊ असे म्हटल्यावर त्यांनी इथून तीन लोकांनी जाण्याची परवानगी दिली असे ते अधिक माहिती देताना म्हणाले. राज, त्याचे वडील आणि आई सोबत निघाले. लग्नाचे कपडे त्यांच्याकडे आले नव्हते म्हणून घरात उपलब्ध असलेल्या कपड्यातच ते निघाले. बाफना कुटुंबातील रुषाली, तिचे आई वडील असे तीन, संघवी कुटुंबातील तीन आणि एक भटजी अशा केवळ सात जणांच्या उपस्थितीत मुंबईतील बाफना कुटुंबाच्या राहत्या घरी हा विवाह सोहळा पार पडला. विशेष म्हणजे, घरातील ज्येष्ठ मंडळींचे आशिर्वाद या नववधू वरांनी व्हिडीओ कॉल द्वारा घेतले तर दोघेही जण राहत असलेल्या सोसायटीनी थाळी वाजवून त्यांचे स्वागत केले. बाफना कुटुंबाकडे जेवण झाल्यावर संघवी कुटुंब आपल्या सुनेला घेऊन घरी आले आणि पारंपरिक पद्धतीने तिचा गृहप्रवेश करून घेतला. माझ्या मुलाचे लग्न साध्या पद्धतीने करण्याची इच्छा असल्याने तसा प्रस्ताव आमच्या व्याहींसमोर मी सहा महिन्यांपूर्वीच ठेवला होता पण त्यांना मात्र धामधुमीत लग्न करायचे होते आणि शेवटी कोरोनामुळे साध्या पद्धतीनेच लग्न करावे लागले. माझ्या दुसऱ्या मुलाचे लग्नही मी अशाच पद्धतीने करणार असे महेंद्र यांनी सांगितले. लग्नात वायफळ खर्च न करता अगदी सध्या पद्धतीने लग्न करा असा संदेश ही संघवी कुटूंबाने दिला.