जागतिक क्षयरोग निवारण दिन
स्नेहा पावसकर लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे - काही वर्षांपूर्वी क्षयरोग म्हटलं की सामान्यांना भीती वाटायची; पण गेल्या वर्षी आलेल्या कोरोनाने या क्षयरोगाची भीती काहीशी कमी केली. मुळातच कोरोनाची धास्ती आणि कोरोना व क्षयरोगाची जवळपास सारखी असलेली लक्षणे यामुळे लोकांनी क्षयरोगाचा विचार करणे किंवा त्यावर उपचार करण्याकडे काहीसा विलंब केलेला दिसतो आहे आणि याचा परिणाम २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये नोंदणी झालेल्या क्षयरुग्णांच्या संख्येवर दिसून येतो. कोरोनामुळे घरातून बाहेर पडता न आल्याने गेल्या वर्षी ठाणे महापालिका आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात क्षयरुग्णांची नाेंद कमी झाली आहे.
ताप, खोकला, थकवा जाणवणे ही क्षयरोगाची लक्षणे साधारण कोरोनाच्या लक्षणांशी मिळतीजुळती आहेत आणि याचमुळे गेल्या वर्षभरात रुग्णांचा क्षयरोगाबाबतचा फोकस कमी झाला. त्याचा विचार, धास्ती कमी झाली आणि ती जागा कोरोनाने घेतली. ही लक्षणे जाणवली की कोरोना तर नाही ना, असा विचार होऊ लागला. परिणामी, गेल्या वर्षभरात ठाणे महापालिका हद्दीत आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील क्षयरुग्णांच्या संख्येत घट झाली आहे, तसेच कोरोनामुळे झालेला सुरुवातीचा कडक लॉकडाऊन यामुळे काही क्षयरुग्णांना उपचारासाठी घराबाहेर पडताच आले नाही. परिणामी, दोन्ही ठिकाणी क्षयरुग्णांची नाेंदणी कमी झाली. सन २०१९ मध्ये ठामपा हद्दीत क्षयरुग्णांची संख्या सुमारे ६५०० होती. तर २०२० मध्ये ५४२० रुग्ण नाेंद झाले. तर अंबरनाथ, भिवंडी ग्रामीण, कल्याण ग्रामीण, मुरबाड, शहापूर या तालुक्यात मिळून २०१९ मध्ये ३५२५ रुग्ण होते. २०२० मध्ये ती संख्या २१६२ इतकी होती. या सर्व रुग्णांना पोषण आहार योजनेंतर्गत महिना ५०० रुपये दिले जातात.
------------------------
आपल्याकडे क्षयरुग्णांनी कोरोनाच्या भीतीपुढे विचार केलाच नाही आणि उपचारासाठीही घराबाहेर पडता येत नव्हते. त्यामुळे जूनपर्यंत रुग्णनाेंदणी कमी होती; मात्र साधारण ऑक्टोबरपासून ठामपाने बायडायरेक्शनल स्क्रिनिंग सुरू केले. म्हणजे ज्यांना टीबी झाला त्यांची कोविड चाचणी आणि ज्यांना कोविड झाला त्यांची टीबी चाचणी केली गेली आणि मग रुग्ण नाेंद झाले. क्षयरोग निवारण दिनानिमित्त आम्ही एक जागृतीपर शॉर्टफिल्म बनवली आहे. त्यात टीबीची माहितीपासून ते तज्ज्ञांचे मार्गदर्शन, रुग्णांचे अनुभव मांडलेले आहेत.
डॉ.प्रसाद पाटील, शहर क्षयरोग अधिकारी, ठामपा.
-----------------
कोरोनाच्या काळात रुग्ण पोहोचू न शकल्याने नोंदणी गेल्या वर्षात काहीशी कमी झाली आहे; मात्र उपचार सुरू असलेल्या बऱ्याच रुग्णांच्या घरापर्यंत आपण तालुका कर्मचाऱ्यांच्याद्वारे औषधेही पोहोचवलेली आहेत. लक्षणे जाणवणाऱ्या जास्तीत जास्त रुग्णांनी जवळच्या आरोग्य केंद्राला भेट देऊन उपचार घ्यावे.
डाॅ.गीता काकडे, जिल्हा क्षयरोग अधिकारी, ठाणे.