मीरा रोड : मीरा- भाईंदरमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आहे. त्याच्या कुटुंबातील अन्य ५ सदस्यांनाही रुग्णालयात दाखल केले असून त्यांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. हा रुग्ण ५५ वर्षांचा असून तीन आठवड्याभरापूर्वी तो पुण्याला जाऊन आला होता. या रुग्णाने मुलगी व मुलाच्या लग्नपत्रिका अनेकांना वाटल्या आहेत. त्याच्या संपर्कातील नागरिकांची शोधाशोध सुरू आहे.
मीरा रोडमध्ये राहणारा ५५ वर्षांचा रुग्ण हा आधी खासगी रुग्णालयात दाखल झाला होता. डॉक्टरांना संशय वाटल्याने शुक्रवारी त्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले. एका खाजगी लॅबने शनिवारी सायंकाळी कोरोनाची लागण झाल्याचा चाचणी अहवाल दिल्यानंतर त्याला पालिकेच्या भीमसेन जोशी रुग्णालयासह शहरातील अन्य काही बड्या खाजगी रुग्णालयांनी दाखल करुन घेण्यास नकार दिला. अकेर रविवारी पहाटे दोनच्या सुमारास कोकीळाबेन रुग्णालयात त्याला दाखल केले. त्याच्यासह त्याच्या मुलासही दाखल केले आहे.त्याला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले़
लग्नपत्रिका वाटण्यासाठी आला होता मुंबईत
रुग्ण वा त्याच्या कुटुंबियातील कुणीही परदेशातून आलेले नाही. मुलगा व मुलीचे लग्न असल्याने रुग्णाने पुण्याला लग्नपत्रिका देण्यासाठी प्रवास केला होता. शिवाय शहरात व मुंबईत अनेकांना पत्रिका वाटल्या. लॉकडाउन जाहीर झाल्यापासून मात्र तो घरातच असल्याचे सांगण्यात आले. रुग्णाने कुठे प्रवास केला व पत्रिका दिल्या याचा शोध घेण्याचे काम सुरू केले आहे.