कल्याण : केडीएमसी हद्दीत दिवसाला ९०० रुग्ण आढळत असून, त्यातील अनेक रुग्ण हे इमारतींमध्ये राहणारे आहेत. ही वाढती रुग्णसंख्या पाहता दिवसाला दीड हजार रुग्ण आढळले तरी त्यांच्यावर उपचार करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. मनपाकडे सहा हजार बेड आहेत. हे बेड कमी पडणार नाहीत, यादृष्टीने नियोजन सुरू आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी सामना करण्यासाठी मनपा प्रशासन सज्ज आहे, अशी माहिती आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.
कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता ३० एप्रिलपर्यंतचे नियोजन करण्यात आले आहे. १५ एप्रिलपर्यंत दिवसाला दीड हजार आणि त्यानंतर दोन हजार रुग्ण आढळले तरी त्यांच्यावर उपचार करण्यासाठी बेड वाढविण्यात येणार आहेत. बेड कमी पडणार नाही, असे नियोजन करण्यात येत आहे. मनपाकडे सध्या पुरेसे बेड आहेत. मात्र, केवळ खाजगी रुग्णालयांत त्यांची कमतरता जाणवत आहे. सध्या मनपा हद्दीत ३० खाजगी कोविड रुग्णालये असून, त्यात एक हजार ०६९ बेड आहेत. आणखीन काही खाजगी रुग्णालये कोविड रुग्णालये करण्याची परवानगी मनपाकडे मागत आहेत. त्यांना त्याच दिवशी परवानगी दिली जात आहे, असे सूर्यवंशी म्हणाले.
मनपा हद्दीतील राखीव कोविड सेंटरच्या जागा निश्चित केल्या होत्या. परंतु, रुग्णसंख्या कमी झाल्याने ती सुरू केलेली नव्हती. त्यापैकी मुंबई विद्यापीठाच्या कल्याण उपकेंद्रात २०० बेड, शहाड येथील साई निर्वाण येथे ६३० बेड उपलब्ध होऊ शकतात. त्याचबरोबर बीएसयूपी प्रकल्पातील घरांमध्ये २०० बेडची सुविधा होऊ शकते. वरप येथील राधास्वामी सत्संग येथे ४०० बेड राखीव आहेत. वसंत व्हॅली आणि टिटवाळा येथील कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहे. तसेच डोंबिवलीतील कोणार्क कंपनीच्या बीओटी प्रकल्पाची पाहणी केली आहे. याशिवाय आणखीन आवश्यकता भासल्यास तात्पुरत्या स्वरूपाची कोविड सेंटर उभारण्यासाठी निविदा मागविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
कोरोनाचे ३५ हॉटस्पॉट, १६५ कंटेनमेंट झोन
मनपा हद्दीत १५ दिवसांपूर्वी कोरोनाचे २४ हॉटस्पॉट होते. आता हीच संख्या ३५ च्या घरात आहे. तर कंटेनमेंट झोनची संख्या १६५ च्या घरात आहे. हॉटस्पॉट आणि कंटेनमेंट झोनची संख्या पाहता कोरोनाचे रुग्ण इमारतींत जास्त आढळत आहेत. ज्या इमारतीत ५० पेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण आढळतील, त्या इमारत परिसरात कोरोनाचे निर्बंध अधिक कठोर करण्यात येणार असल्याचा इशारा सूर्यवंशी यांनी दिला आहे.
----------------