ठाणे - भाजपा नेते आणि खासदार नारायण राणे यांनी केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पासंदर्भात माहिती देण्यासाठी ठाण्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना राणेंनी शिवसेना आणि महाविकास आघाडीला टार्गेट केले. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी शिवसेना नेते संजय राठोड यांचा राजीनामा द्यावा, पण त्याअगोदर सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागेल, असे म्हणत नाव न घेता पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंवर प्रहार केला. तर, राज्यातील ाढत्या कोरोना परिस्थितीबाबत प्रश्चचिन्ह उपस्थित केलं आहे. विधानसभा अधिवेशन लवकरात लवकर गुंडाळायचं असेल, असे म्हणत राणेंनी सरकारला लक्ष्य केलं
कोरोनामुळे जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्था कोलमडल्या आहेत, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला सावरलं. अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी मांडेलला यंदाचा अर्थसंकल्प हा देशाला महासत्तेच्या दिशेने नेणारा आहे. देशातील कोरोना स्थिती आता संपुष्टात येताना दिसत आहे. पण, महाराष्ट्रात कोरोना वाढतोय. अधिवेशन जवळ आलं की कोरोना वाढतो, म्हणजे दोन दिवसांतच अधिवेशन संपवता येतं, असं म्हणत राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येवर नारायण राणेंनी प्रश्नचिन्ह उभारलं आहे. आताचं अधिवेशन हे अर्थसंकल्पीय आहे, हे कमीत कमी दीड महिनाभर चालतं. पण, अधिवेशन लवकर गुंडाळायचं असेल, म्हणून मुख्यमंत्र्यांनी हे सांगितलं असेल, असा आरोपच राणेंनी केलाय. आता, दोन दिवसांचं अधिवेशन घेतील आणि मातोश्री या पिंजऱ्यातून ते बाहेर येतील, असे म्हणत उद्धव ठाकरेंवर प्रहार केला.
देशाला समृद्ध बनविणारा अर्थसंकल्प
देशातील कोरोना संकटावर मोदींनी मात केलीय, म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो. जगाच्या पाठिवर मोदींच्या कामाचं कौतुक होतंय. मोदी सरकारनेच दोन लसी निर्माण केल्या, अजूनही 13 नवीन लसी येणार आहेत, असे केंद्रीयमंत्री हर्षवर्धन यांनी सांगितल्याचं राणेंनी म्हटलं. यंदाचा अर्थसंकल्प हा शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारा, बेकारी दूर करणारा, महिला सबलीकरण, सैन्याला बळकटी देणारा, देशाला समृद्ध बनविणारा हा अर्थसंकल्प असल्याचे राणेंनी म्हटले.
कुंपणच शेत खातंय
नारायण राणे यांनी इंधन दरवाढ, पूजा चव्हाण आत्महत्या, शिवजयंती, मराठा आरक्षण यांसह विविध मुद्द्यांवरुन शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले. शिवसेनेचं सरकार आल्यापासून त्यांच्या ज्या ज्या मंत्र्यावर आरोप झाले त्यांच काय झालं. सुशांतप्रकरणी दिशाच्या केसमध्ये हत्याऐवजी आत्महत्याच सांगितली. हे सरकार महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना पाठबळ देतंय. इथं कुंपनच शेत खातंय, असे म्हणत पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी राणेंनी शिवसेना आणि सत्ताधिकाऱ्यांर टीका केली.
गुंडांच्या मिरवणुकांना परवानगी
शिवसेना आणि हिंदुत्वाचा आता संबंध उरला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अभिमान-स्वाभीमान नसलेली शिवसेना आहे. बाळासाहेबांच्यावेळी वेगळी शिवसेना होता, आता संजय राठोड यांच्या समर्थनार्थ मोर्चाला परवानगी दिली जाते. आदित्य ठाकरेंच्या समर्थनार्थ मोर्चा निघतो, त्याला परवानगी मिळते. मग, शिवजयंतीला परवानगी का नाही मिळत, असा सवाल नारायण राणेंनी उपस्थित केला आहे. तसेच, शिवसेनेच्या सत्तेत साधू-संतांच्या आणि शिवाजी महाराजांच्या मिरवणुकांना बंदी, पण गुंडांच्या मिरवणूकांना परवानगी आहे, असे म्हणत पुण्यातील मारणेंच्या जल्लोष मिरवणुकीवर राणेंनी टीका केली.