ठाणे : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात अनेकांचे संसार उदध्वस्त झाले आहेत. कोणाच्या घरचा कर्ता पुरुष गेला तर कोणाची आई, कोणाचा मुलगा तर कोणाचे अख्खे कुटुंबच कोरोनाने हिरावून नेले आहे. याच कोरोनाने ठाणे जिल्ह्यातील तब्बल एक हजार ४३९ बालकांचे छप्पर हिरावले आहे. यामध्ये ४२ बालकांचे आई-वडील तर एक हजार ३९७ बालकांनी एक पालक गमावला आहे. त्यामुळे या बालकांवर आता दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शासनाकडून या मुलांना मदत दिली जाणार आहे. परंतु, हक्काचे मायेचे छप्पर मात्र कोण देणार असा सवाल केला जात आहे.
ठाणे जिल्ह्यात मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनाने शिरकाव केला. त्यावेळी अत्यल्प प्रमाणात आढळून येणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ होऊ लागल्याचे दिसून आले. तर कोरोनाच्या या पहिल्या लाटेत अनेकांचे संसार उदध्वस्त झाले. अनेक कुटुंब उदध्वस्त झाली. तर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही रुग्णांची संख्या वाढतानाच मृत्यूंचे प्रमाण अधिक वाढले. सध्या जिल्ह्यात पाच लाख २४ हजार २८७ इतकी कोरोनाबाधितांची संख्या असून आतापर्यंत पाच लाख आठ हजार ९६० इतके जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, १० हजार ३५४ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून विविध रुग्णालयांत चार हजार ९७३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
पाच हजार २६ कुटुंबांचे केले सर्वेक्षण
या आजाराने मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये ज्येष्ठांपासून तरुणांचे देखील प्रमाण अधिक आहे. असे असले तरी अनेक बालकांच्या डोक्यावरचे माता-पित्यांचे छप्पर हिरावून घेतल्याने ती पोरकी झाली आहेत. त्यानुसार कोरोना काळात मृत्यू झालेल्या पाच हजार २६ कुटुंबांचे जिल्हा प्रशासनाने सर्वेक्षण केले. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील ० ते २३ वयोगटातील एक हजार ४३९ बालकांवरील आई-वडिलांच्या मायेचा हात हरपला आहे. यामध्ये ४२ बालकांनी दोन्ही पालक गमावले तर, एक पालक गमावलेल्या एक हजार ३९७ बालकांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
......................................
दोन पालक गमावलेल्या बालकांची संख्या
वयोगट बालकांची संख्या
० ते १८ - ३२
१८ ते २३ - १०
.................................
एक पालक गमावलेल्या बालकांची संख्या
वयोगट बालकांची संख्या
० ते १८ - ९५९
१८ ते २३ - ४३८