सुधारित बातमी
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोनानंतर जवळपास सर्वच घरातील किचनमध्ये बदल झाला आहे. फास्ट फूड ते हेल्दी फूड असा प्रवास पाहायला मिळत आहे. त्यानिमित्ताने नव्या पिढीला मूळ भारतीय पारंपरिक आहाराची ओळख होत आहे. कोणते पदार्थ खावे आणि कोणते टाळावे यासाठी आहारतज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेण्यासाठी आहारप्रेमींच्या रांगा लागल्या आहेत.
-----------------------------
जंक फूडला केले बाय बाय
बर्गर्स, पिझ्झा, बिस्किट्स, इन्स्टंट फूड, रेड़ी टू कुक, ब्रेड,, पाव, मैद्याचे पदार्थ, कोल्ड्रिंक्स, चायनीज, फ्रॅंकी, पॅक केलेले अन्न पदार्थ, चरबीयुक्त पदार्थ, चिप्स, फरसाण, मिठाई यांसारख्या वजन वाढविणाऱ्या पदार्थांना गृहिणींनी आपल्या किचनमधून बाय बाय केले आहे.
------------------------------
पौष्टिक पदार्थांनी घेतली जागा
फास्ट फूड ते सकस आहार असा किचनमध्ये प्रवास या काळात झाला. उकडलेल्या भाज्यांचे सूप, मोड आलेले कडधान्य, ओट्स, मुसळी, हिरव्या पालेभाज्यांचा आणि फळभाज्यांचा अधिक वापर, प्रथिनयुक्त पदार्थ, फळे, दही, ताक, नारळपाणी, नाचणी, बाजरी, ज्वारीच्या भाकरी, पुदिना, अळशी, मध, लिंबू, कोकम सरबत, लापशी, पनीर, रवा, पोहे, थालीपीठ या पौष्टिक पदार्थांनी आता किचनमध्ये जागा घेतली आहे.
------------------------------
रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी घरचे अन्नपदार्थ खाण्यावर भर असावा. पण आपल्या आहारात ऋतूमानानुसार बदल करावा. सध्या कोविड आणि पावसाळा अशी परिस्थिती आहे. त्यामुळे पावसाळ्यात येणाऱ्या रानभाज्या अधिक खाव्यात. त्यात प्रचंड प्रतिकारशक्ती असते. तसेच, नासपती, चेरी, प्लम, पिच, लीची यांसारखी फळे या दिवसांत खाल्ली जावी. अळूच्या पानांच्या भाजीला या दिवसांत महत्त्व असते. सुंठ, गूळ, ज्येष्ठ मध याची गोळी करून ती दोन्ही वेळच्या जेवणानंतर खाल्ल्यास पचनक्रिया सुधारते. पावसाळ्यात दहा ग्लास पाणी प्यावे त्यातील पाच ग्लास कोमट पाणी असावे. या काळात ब्रेडला बुरशी लागण्याचे प्रमाण अधिक असल्याने ब्रेड, बिस्किटचा वापर टाळावा. प्रतिकारशक्तीचा पाया हा रोजच्या जेवणावर आधारित असते. प्रत्येक जेवणात प्रथिनांचा पुरेपूर वापर व्हावा. रात्रीचे जेवण हलके असावे, यावेळी सूप पिण्यावर भर असावा. मुगाचे दोन वाटी वरणदेखील पिऊ शकता.
- डॉ. दीपाली आठवले, सुप्रसिद्ध आहारतज्ज्ञ
----------------------------
कोरोना काळात सकस आहाराचे महत्त्व पटले आहे. आहारतज्ज्ञांकडून काय खावे आणि काय खाऊ नये याची योग्य मार्गदर्शन मिळू लागले आणि जंक फूड ऐवजी किचनमध्ये पौष्टिक पदार्थचा समावेश केला. या पदार्थांनीदेखील पोट भरत हे जाणवू लागले. पूर्वी फक्त पोळी भाजीवर आमचा भर असायचा आता आम्ही भाकरीदेखील खातो. भरमसाठ एकाच वेळी न खाता टप्प्याटप्प्याने खातो. पाण्यावर जास्त भर देत आहोत. मग कधी लिंबू सरबत तर कधी कोकम सरबतचे सेवन करतो. दैनंदिन जीवनातून चहाचे प्रमाण देखील कमी केले आहे.
- मृणाल महाडिक
------------------------------
फास्ट फूडचे दुष्परिणाम प्रत्येकाला जाणवले आहे. आमच्या किचनमधील प्रवास पिझा, बर्गर पासून थालीपीठपर्यंत तर सॉफ्ट ड्रिंक पासून लिंबू सरबतपर्यंत आला आहे. एका गृहिणींच्या बदल झाला की पाच घरेदेखील बदलतात मला पाहून आता माझ्या मैत्रिणी सकस आहाराकडे वळल्या आहेत. माझी मुले नाचणीची भाकरी, भाज्या आवडीने खातात आहेत.
- शाहीन शेख
-------------------------------
सर्वच जण आता सकस आणि पौष्टिक आहाराबाबत जागरूक झाले आहेत. फास्ट फूड मुळे स्वतःचे वजन किती वाढते हे सर्वांना जाणवले आहे. त्यामुळे घरोघरी किचनमध्ये बदल झाला आहे. - सरिता पवार