ठाणे : एकीकडे शहरात कोरोना बाधीत रुग्णांची वाढणारी संख्या ठाणेकरांची डोकेदुखी बनत असतांना आता ठाण्यातील वागळे इस्टेट भागातील शिवाजी नगर भागात एका ६० वर्षीय कोरोना बाधीत रुग्णाचा रस्त्यावर तडफडून मृत्यु झाल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. या नागरीकाच्या बाजूला १०० ते १५० नागरीक होते, ते त्याचा मृत्यु उघड्य डोळ्यांनी बघत होते, अॅब्युलन्सही त्याला घेण्यासाठी आली. मात्र सोबत डॉक्टर स्टॉफ नव्हता, त्यामुळे पीपीई कीट अभावी त्याला अॅब्युलेन्समध्ये टाकण्यास कोणीही पुढे सरसावला नाही. त्यामुळे दोन तास त्याची रस्त्यावर परवड सुरु होती. अखेर त्याचा तिथेच मृत्यु झाला. वागळे इस्टेट भागातील शिवाजी नगर भागात ही दुर्देवी माणुसकिला काळामी फासणारी घटना समोर आली आहे. या भागात राहणाऱ्या ६० वर्षीय व्यक्तीला ताप येत होता. त्यामुळे त्याची सोमवारी कोरोना चाचणी करण्यात आली. त्यानंतर मंगळवारी त्याला जास्तीचा त्रास होऊ लागल्याने त्याच्या मुलीने त्यांना कळवा रुग्णालयात नेले. मात्र जागा नसल्याचे सांगून आणि तापाचा रुग्ण दाखल करुन घेत नसल्याचे कारण पुढे करीत, त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात सांगण्यात आले. मात्र तेथेही त्याला उपचारासाठी दाखल करुन घेण्यात आले नाही. तापाच्या रुग्णाला आम्ही दाखल करुन घेत नाही, आधी रिपोर्ट आणा मगच दाखल करुन घेतो असे त्यांना सांगण्यात आले. अखेर त्या मुलीने आपल्या पित्याला पुन्हा घरी नेले. त्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास त्याला जास्तीचा त्रास होऊ लागला. त्यानंतर त्या मुलीने तेथील माजी स्थानिक नगरसेवकाला सांगून अॅब्युलेन्स मागविली. अॅब्युलेन्स देखील चारच्या सुमारास त्या परिसरात दाखल झाली. तेव्हाच त्याचा रिपोर्टही आला होता, त्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. परंतु, अॅब्युलेन्स घेऊन येणारा चालकाशिवाय डॉक्टर किंवा इतर कोणताही स्टाफ आला नव्हता. तो पर्यंत परिसरातील सुमारे १०० ते १५० नागरीक त्या रुग्णाची होणारी परवड पाहत होते, कारण त्याचा अहवाल हा पॉझीटीव्ह आल्याने कोणीही पुढे जाण्यास तयार होत नव्हता. बघ्यांची गर्दी केवळ त्याची तडफड पाहत होते. तो तडफडत होता, त्याला खुप त्रास होत होता. परंतु पीपीई किट नसल्याने कोणीही पुढे जाण्यास धजावत नव्हता. यात दोन तासांचा कालावधी निघून गेला आणि त्यातच त्या व्यक्तीचा तेथेच मृत्यु झाला. माणुसकीला काळीमा फासणारी आणि हृदय पिळवटून टाकणाºया या घटनेला जबाबदार कोण असा सवाल मात्र या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
कोरोना बाधीत रुग्णाचा तडफडून रस्त्यावरच मृत्यु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 3:16 PM