ठाणे : दिवसेंदिवस ठाण्यात कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होत आहे. त्यानुसार शहरातील रुग्णालये देखील कमी पडण्याची भिती महापालिकेला वाटू लागली आहे. त्यामुळे भविष्यातील हा धोका डोळयासमोर ठेवून महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी यापुढे शहरातील कोरोना बाधीत रुग्णांनाच ठाण्यातील रुग्णालयात उपचार मिळतील असा आदेश काढला आहे. त्यामुळे आता शहराबाहेरील रुग्ण असेल तर त्याला तो ज्या ठिकाणी वास्तव्यास असेल त्याच ठिकाणी उपचार त्याला घ्यावे लागणार असल्याचेच यातून स्पष्ट होत आहे. ठाणे महापालिका हद्दीत कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ८०० च्या आसपास येऊ न ठेपली आहे. त्यात उपचार घेऊन बरे झालेल्यांची संख्या २३६ च्या एवढी आहे. तर आजही महापालिकेच्या भार्इंदरपाडा येथील विलगीकरण केंद्रात हायरीस्कमधील ८०० च्या आसपास रुग्ण आहेत. त्यामुळे भविष्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढण्याची भिती व्यक्त होत आहे. त्यात सध्या जी काही खाजगी रुग्णालये, शासकीय रुग्णालये, हॉटेल या ठिकाणी राखीव ठेवण्यात आलेल्या १ हजार १५१ एवढी आहे. तसेच भविष्यात रुग्णांची संख्या वाढणार असल्याने यासाठी आणखी काही खाजगी रुग्णालये यासाठी आरक्षित करावी लागणार आहेत. त्या दृष्टीने महापालिकेकडून आतापासूनच हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यात ठाणे शहराची लोकसंख्या ही २५ लाखांच्या घरात आहे. त्या दृष्टीने येथील रुग्णांना अधिक प्राधान्य देणे महत्वाचे आहे. त्यामुळे भविष्यात शहरातील वाढत्या रुग्णांना आरक्षित करण्यात आलेली रुग्णालये त्या ठिकाणच्या खाटा कमी पडणार असल्याचे पालिकेचे मत आहे. त्या अनुषंगाने आता महाापलिका आयुक्त विजय सिंघल यांनी हे पाऊल उचलले आहे.त्यानुसार आता शहराबाहेरील रुग्णांना आता यापुढे शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार मिळणार नसल्याचे आदेश आयुक्तांनी काढले आहेत. त्यानुसार मे अखेर पर्यंत ८५०८ खाटांची गरज शहराला भासणार आहे. त्यामध्ये किरकोळ लक्षणे असणारे ६० टक्के रुग्ण (५१०५) रुग्णांना कोव्हीड केअर सेंटरमध्ये दाखल केले जाईल, तरी २० टक्के रुग्णांना १७०२ मध्यम स्वरुपातील लक्षणे असणाऱ्या रुग्णांना डीसीएचसी (डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर) मध्ये दाखल करणे अपेक्षित आहे. तर ज्या रुग्णांना विशेषतज्ञांच्या सेवा लागतील अशा १७०२ रुग्णांना डीसीएच (डेडीकेटेड कोव्हीड हॉस्पीटल) मध्ये दाखल करावे लागणार आहे. त्या अनुषंगाने हे आदेश काढण्यात आल्याचे पालिकेच्या सुत्रांनी स्पष्ट केले.
महापालिका हद्दीत आता केवळ ठाण्यातीलच कोरोना बाधीत रुग्ण उपचार घेणार, महापालिका आयुक्तांना काढला आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 3:40 PM