ठाणे : रविवारी पुन्हा कोरोनाचे दोन नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी एका रुग्णावर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात तर एका रुग्णावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या २८ आहे. यापैकी २६ रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत. या रुग्णांपैकी पाच रुग्ण हे कोविडच्या जे -वन प्रकारातील असल्याचे आढळले आहे. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी याला दुजोरा देत घाबरण्याची गरज नसल्याचे सांगितले.
नवीन प्रकारातील सर्व पाच रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार केले जात आहेत. तसेच ठाण्यात आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढवणे, सर्व आरोग्य केंद्रांमध्ये तापाच्या ओपीडीमध्ये येणाऱ्या नागरिकांची कोविड चाचणी करणे, कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात खाटांची संख्या वाढविण्याच्या सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत. महापालिका प्रशासन पूर्णपणे सतर्क असून ठाणेकरांनीही सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करावे.
२०२० आणि २०२१ मधील जागतिक कोरोना आजारामुळे प्रशासनासह सर्वसामान्य नागरिकांची चिंता वाढली होती. मात्र त्यानंतर हळूहळू हा आजार दूर झाला आणि गेल्या दोन-तीन वर्षांत हा आजार दूर झाल्याने आरोग्य यंत्रणेसह सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दरम्यान, आता पुन्हा दोन जणांना कोरोनाची लागण झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.अनिरुद्ध माळगावकर यांनी सांगितले की, ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रुग्णावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे. रुग्णालय प्रशासनाच्या वतीने रुग्णाचे नमुने एनआयव्ही पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात येणार असून तेथे अहवाल आल्यानंतरच कोरोनाच्या प्रकारांबाबत माहिती समोर येईल. तथापि, एकूण २८ रुग्णांपैकी पाच रुग्ण जे1 प्रकारातील आहेत. प्रत्येकावर घरी उपचार केले जात आहेत आणि कोणतीही गंभीर लक्षणे आढळली नाहीत.