लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे. मात्र, याच कालावधीत कोरोना झालेल्या बहुतांशी जणांच्या शस्त्रक्रियांचे नियोजनही रखडले आहे. दुसऱ्या लाटेतील या रुग्णांवर आरोग्यदृष्ट्या शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. पण, कोरोनामुळे शस्त्रक्रिया उशिरा करण्याचा संभ्रम या रुग्णांमध्ये आहे. त्यामुळे बहुतांशी जणांच्या शस्त्रक्रिया रखडल्या आहेत. त्या करायच्या की पुढे ढकलायच्या या द्विधा स्थितीत रुग्ण आढळून येत आहेत.
येथील जिल्हा रुग्णालय हे कोविड रुग्णालय म्हणून दीड वर्षापासून घोषित आहे. तेथे महिलांच्या बाळंतपणाच्या कलावधीतील सिझर ही शस्त्रक्रिया फक्त केली जात आहे. उर्वरित अत्यावश्यक शस्त्रक्रिया करण्यासाठी येथील कळवा रुग्णलय किंवा मुंबईला जे. जे. सायन्स रुग्णालयाला रुग्ण पाठवला जात आहे. कोरोनाच्या कालावधीतही त्या केल्या जात आहेत. पण, काही रुग्णांची कोरोनाची चाचणी पाॅझिटिव्ह येताच दीड ते दोन महिन्यांच्या कालावधीनंतर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला जात असल्याने जिल्ह्यातील रुग्ण संभ्रमावस्थेत असले तरी ती किती आवश्यक आहे, याची जाणीव करून देऊन तसा सल्ला दिला जात आहे. आवश्यक असल्यास रुग्णांची मानसिकता व सशक्तपणा या गोष्टी लक्षात घेऊन शस्त्रक्रिया केल्या जात असल्याचे निदर्शनात आले आहे.
-----
१) कोरोनाचे एकूण रुग्ण - ५,५४,२१३
बरे झालेले रुग्ण - ५,४२,८७५
कोरोनाचे बळी - ११,३३८
-------
२) दीड महिना वाट पाहा
- कोरोना झाल्यानंतर अशक्तपणा येतो. रुग्ण मानसिकदृष्ट्या फिटनेस नसतो. कोरोनामुळे कमीत कमी १५ दिवस अशक्तपणा अधिक जाणवतो. त्यामुळे रुग्णाकडून शस्त्रक्रियेला कमी प्रतिसाद मिळतो. त्यामुळे महिना ते दीड महिना उशिरा शस्त्रक्रिया करणे उत्तम आहे. या कालावधीत रुग्ण शस्त्रक्रिया करण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार होतो. यासाठी दीड महिन्याचा सल्ला डॉक्टर देतात.
------