लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत गेले वर्षभरात एक लाखांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर सद्यस्थितीला रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही समाधानकारक आहे. एकीकडे मृत्यूदरात घट झाली असताना दुसरीकडे रुग्ण दुपटीचा कालावधी ४३ दिवसांवरून ५२ दिवसांवर गेल्याने केडीएमसीला किंचितसा का होईना दिलासा मिळाला आहे.
गेले वर्षभरातील कोरोना रुग्णांचा आढावा घेता सोमवारपर्यंत केडीएमसीच्या हद्दीत एक लाख १७ हजार २३० रुग्ण आढळले आहेत. एक हजार ३९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर एक लाख एक हजार ३५० इतके रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत १२ जुलैला सर्वाधिक ६६१ रुग्ण आढळले होते. त्यावेळी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ९ ते १० दिवसांवर आला होता. दरम्यान, मध्यंतरीच्या काळात रुग्ण दुपटीचा कालावधी २१० ते २६० दिवसांवर गेला होता; परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने पुन्हा हाहाकार उडविला आहे.
मार्चपासून रुग्ण संख्येत वाढ व्हायला सुरुवात झाली. एप्रिलच्या सुरुवातीपासूनच दररोज आढळणारी रुग्णसंख्या दीड ते दोन हजारांच्या आसपास होती. ११ एप्रिलला तर एका दिवसात दोन हजार ४०५ नवे रुग्ण आढळले होते. दैनंदिन रुग्णवाढीतील ही आजवरची सर्वोच्च संख्या होती. रुग्ण मोठ्या संख्येने आढळत असल्याने रुग्ण दुपटीचा कालावधी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कमी होऊन तो अवघ्या ४३ दिवसांवर आला होता. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण पाहता मृत्यूदर हा १.६७ टक्के इतका होता.
दरम्यान, या कालावधीत रुग्णवाढ होत राहिली तरी रुग्ण बरे होणाऱ्यांचे प्रमाणही हजारांहून अधिक होते. सध्या नव्याने आढळणाऱ्या रुग्ण संख्येत घट झाली असताना रुग्ण बरे होण्याची संख्या वाढली आहे. रुग्ण दुपट्ट होण्याचा कालावधीही आता ५२ दिवसांवर गेला आहे. तर मृत्यूदरात घट होऊन तो आता १.१९ टक्क्यांवर आला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या ८६.४५ टक्क्यांवर पोहोचले आहे.
--------------------------------
रुग्ण दुपटीचा कालावधी वाढायला हवा
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. रुग्ण दुपटीचा कालावधीही ४३ वरून आता ५२ दिवसांवर गेला आहे. हे समाधानकारक असले तरी रुग्ण दुपटीचा कालावधी अधिक वाढायला हवा, असे मत केडीएमसीच्या साथरोग नियंत्रक विभागाच्या अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी व्यक्त केले.
---------------------------