उल्हासनगर : कोरोना पोझिटिव्ह रुग्ण बेड अभावी वेटिंगवर ठेवण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघड झाली. बेड अभावी रुग्णाची हेडसांड होत असून पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कातील कुटुंबासह इतरांना क्वारंटाईन करण्यास दिरंगाई होत असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
उल्हासनगरातील कोरोना रुग्णालय फुल झाले असून पोझीटीव्ह आलेल्या रुग्णांना बेड उपलब्ध होत नाही. त्यामुळे त्यांना वेटींगवर ठेवण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघड झाली. महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ सुहास मोहणालकर यांच्या सोबत संपर्क साधला असता, त्यांना याबाबत माहिती नोव्हती. त्यांनी याबाबत परिस्थितीचा आढावा घेवून माहिती देत असल्याचे सांगितले. मात्र त्यानंतर त्यांचा संपर्क झाला नाही. शहर पूर्वेतील शासकीय प्रसूती गृह रुग्णालय, विमा रुग्णालय, डॉ बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका, आयटीआय कॉलेजचे रुपांतर कोरोना रुग्णालयात केले. तर रेडक्रॉस रुग्णालय संशयित रुग्णाचा उपचारासाठी आरक्षित ठेवले. मात्र या सर्व रुग्णालयाची क्षमता केंव्हाच संपली आहे.
शहरातील कोरोनाची वाढती संख्या बघून जिल्हाधिकारी कार्यालयाने सीएचएम, आरकेटी कॉलेजेसह फॉरवर्ड लाईन येथील राधास्वामी सत्संगची जागा कोरोना रुग्णालय साठी ताब्यात घेण्याचे आदेश महापालिकेला दिले आहे. दरम्यान महापालिकेने कॅम्प नं-५ येथील तहसील कार्यालयाच्या नवीन इमारती मध्ये कोरोना रुग्णालय उभारण्याचे काम सुरू केले. तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका शेजारील पालिका शाळा क्र -२९ मध्येही कोरोना रुग्ण ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र दोन्ही ठिकाणचे कामे अद्याप पूर्ण झाले नसल्याने तेथे रुग्ण ठेवता येत नाही. गेल्या ४ दिवसात ९०० पेक्षा जास्त पोझीटीव्ह कोरोना रुग्ण शहरात आढळून आल्याने, वाढीव रुग्ण कुठे ठेवायचे?. असा प्रश्न महापालिका आरोग्य विभागा समोर पडला आहे. त्यातूनच रुग्णाची वेटिंग लिस्ट सुरु झाल्याचे बोलले जात आहे.
चौकट
संपर्कात आलेल्यां नागरिकांचे क्वारंटाईन नाही.
शहरात पोझीटीव्ह आढळून आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांची व कुटुंबातील सदस्यांना जागे अभावी क्वारंटाईन केले जात नाही. या प्रकाराने कोरोना संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत असून भिवंडी येथील टाटा आमंत्रण क्वारंटाईन सेंटर मध्येही बेड खाली नसल्याची बाब समोर आली आहे.