लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : शहरात दिवसाला सरासरी एक हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांची भर पडत असल्याची बाब लक्षात घेऊन गरजू रुग्णांना रुग्णालयात दाखल होताना कुठलीही अडचण होऊ नये, यासाठी ठाणे महापालिका सज्ज असून तीन नव्या कोविड रुग्णालयांच्या माध्यमातून अडीच हजार बेड्स लवकरच सेवेत दाखल होत आहेत. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी व्होल्टास आणि ज्युपिटर रुग्णालयांशेजारील पार्किंग प्लाझा येथे महापालिकेने उभारलेल्या कोविड रुग्णालयांची पाहणी करून तयारीचा आढावा घेतला.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत बुश कंपनीच्या जागेत रुग्णालय सुरू केले होते. तिथे ४५० बेड क्षमता आहे. परंतु, मधल्या काळात कोरोनाची रुग्णसंख्या कमालीची घटल्यामुळे या रुग्णालयाचा पूर्ण क्षमतेने वापर होत नव्हता. मात्र, आता पुन्हा रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे हे पुन्हा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले. तसेच, पोखरण रोड क्र. २ येथील व्होल्टास कंपनीच्या जागेवर एक हजार बेड क्षमतेचे रुग्णालय उभारले असून तेही रुग्णसेवेत दाखल होण्यासाठी सज्ज आहे. ज्युपिटर रुग्णालयानजीकच्या पार्किंग प्लाझा येथे ११६९ बेड क्षमतेचे रुग्णालय उभारले असून त्याचा अंशतः वापरही सुरू झाला आहे. सद्य:स्थितीत या ठिकाणी ३५० बेड्सचा वापर सुरू आहे. मनुष्यबळ वाढवून ते पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच, या ठिकाणी आणखी किमान ५०० बेड्स वाढवण्याची क्षमता असून त्यादृष्टीनेही नियोजन करण्याची सूचना केली.
तीन दिवसांपूर्वी ठाणे महापालिकेत सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कोरोनाच्या लढ्यासाठी पुन्हा पूर्ण क्षमतेने सज्ज होण्याचे आदेश त्यांनी दिले होते. बेड उपलब्ध नाही, ॲम्ब्युलन्स मिळत नाही, अशा तक्रारी येता कामा नयेत. या दृष्टीने महापालिका प्रशासनाने तयारी करावी, असे निर्देश देतानाच कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा त्यांनी दिला होता. त्यानंतर, महापालिका प्रशासनाने कंबर कसली असून तीन कोरोना रुग्णालये तातडीने रुग्णसेवेत दाखल करण्यात येणार आहेत. त्यांची पाहणी शनिवारी शिंदे यांनी केली. महापौर नरेश म्हस्के, अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख, उपायुक्त अशोक बुरपुल्ले, विश्वनाथ केळकर, संदीप माळवी, आरोग्य अधिकारी डॉ. राजू मुरूडकर, डॉ. खुशबू टावरी व अन्य वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
ऑक्सिजन बेड्सना ऑक्सिजनचा पुरवठा अव्याहृत होईल, याची खबरदारी घेण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले. रुग्णालयांमध्ये तसेच क्वारंटाइन सेंटरमध्ये जेवणाच्या अथवा गैरसोयीच्या कुठल्याही तक्रारी येता कामा नयेत, असेही त्यांनी बजावले. औषधांचा पुरेसा साठा करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. प्रत्येक रुग्णाचा जीव महत्त्वाचा असून रुग्णालयात दाखल होण्यासाठी रुग्णाला तिष्ठत राहावे लागता कामा नये किंवा त्याला वणवणही करावी लागता कामा नये. त्याच्यावर तातडीने उपचार होण्याची गरज असून पहिल्या टप्प्यात महापालिकेने ज्या कार्यक्षमतेने काम केले, त्याच क्षमतेने किंबहुना त्याहीपेक्षा अधिक सजगपणे काम करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.