कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील सदस्यांची मुदत ११ नोव्हेंबरला संपुष्टात येत आहे. मात्र, कोरोनाचा कहर सुरूच असल्याने निवडणूक घेण्याबाबत अद्याप कोणतेच आदेश निवडणूक विभागाकडून महापालिकेस मिळालेले नाहीत. त्यामुळे निवडणूक २०२१ मध्ये होऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
ऑक्टोबर २०१५ मध्ये १२२ प्रभागांसाठी केडीएमसीची निवडणूक झाली. त्यानंतर सदस्य मंडळाने मतदान करून महापौरांची निवडणूक ११ नोव्हेंबरला पार पडली. परंतु, या सदस्य मंडळाची मुदत संपण्यापूर्वी प्रभागरचना ठरवावी लागते. त्याची प्रक्रिया जूनपासून सुरू होणो अपेक्षित होते. मात्र, सर्वत्र असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे केडीएमसीसह राज्यातील अनेक ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. कोरोनामुळे केडीएमसीतील सदस्य मंडळाची मुदत संपत असली, तरी त्याआधीची प्रक्रियाच पार पाडलेली नसल्याने निवडणूक होणार नाही. ही निवडणूक २०२१ मध्येच होणार आहे.
दरम्यान, सदस्य मंडळाचा कार्यकाळ संपुष्टात आल्यावर आम्ही नगरसेवक म्हणून गणले जाणार की नाही, असा प्रश्न नगरसेवकांना पडला आहे. कारण, २०१५ च्या केडीएमसीच्या निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने २७ गावे मनपात समाविष्ट केली होती. त्यामुळे मनपाचे क्षेत्रफळ तसेच प्रभागसंख्या १०७ वरून १२२ पर्यंत वाढली. तर, आता राज्य सरकारने २७ गावांपैकी १८ गावे वगळून त्यांची स्वतंत्र कल्याण उपनगर परिषद करण्याची घोषणा केली आहे. त्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, या प्रक्रियेस आक्षेप घेणाऱ्या याचिका न्यायालयात न्यायप्रविष्ट आहेत.
प्रशासक नेमण्याची मागणी
- केडीएमसीतून १८ गावे वगळल्याने प्रभागांची रचना नव्याने करावी लागणार आहे. त्यात प्रभागांची संख्या कमी होणार आहे. गावे वगळल्याने १३ नगरसेवकांचे सदस्यत्त्व संपुष्टात आले आहे.
- वगळलेली गावे सोडून उरलेल्या १०९ सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने नव्याने प्रशासक नेमला जाणार का, असा सवाल केला जात आहे.
- १८ गावांच्या उपनगरपरिषदेची प्रक्रियाही सुरू आहे. तेथे लोकप्रतिनिधी नसल्याने नवी उपनगर परिषद अस्तित्वात येईर्पयत तेथे एक प्रशासक नेमला जावा, अशी अनेकांची मागणी आहे.